पिंपरी चिंचवड : महापोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला आहे. हिंजवडी इथल्या परीक्षा केंद्रावर अचानक वीज गेल्यान परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट येथे हा प्रकार घडला. पाठ्यपुस्त महामंडळाच्या लिपीक पदासाठी आज महापोर्टलकडून परीक्षा घेतली जात आहे.


ही परीक्षा सकाळी दहा वाजता सुरु झाली. दोन तासांच्या या परीक्षेत पहिल्या अर्ध्या तासातच वीज गेली अन् एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बाहेर काढलं, असा आरोप होत आहे. तर काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पेपर लीक केल्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुढचा पेपर याच केंद्रावर दुपारी एक वाजता सुरु होणार आहे.

त्यामुळे वीज गेल्याने महापोर्टल परीक्षेचा फज्जा उडाला आहे. सर्व कम्प्युटर बंद पडल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ केला. आता पोलिसांनाही बोलावल्याची माहिती मिळत आहे. "व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती दिलेली नाही. पीसी का बंद केले, कोणत्या उपाययोजना केल्या, बॅकअप ब्लॅनची कल्पना दिलेली नाही. विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आहे. पेपर न देता बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा," अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.

महापोर्टल बंद करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
वर्ग तीन आणि वर्ग चारच्या पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 'महापोर्टल' सुरु केलं. पण या डिजिटलमुळे मुलांना अधिक फी द्यावी लागली. सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्याचा वेळ वाढला. ऑनलाईन पेमेंटसाठी वेगळे पैसे, त्यात भर म्हणून महापोर्टलद्वारे एकाच पदाची परीक्षा घेण्यासाठी 24-24 दिवस लागले. या गोंधळाच्या विरोधात मुलांनी मोर्चा काढला आणि महापोर्टल बंद करण्याची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांचे 'महापोर्टल'वर प्रश्न?
- अर्ज करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक पदासाठी वेगळा आयडी का बनवावा लागतो?
- पूर्वी 300 रुपये फी होती, आता खुल्या वर्गासाठी 500, राखीव वर्गासाठी 375 रुपये फी का?
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 50 रुपये, पेमेंटसाठी 20 रुपये हा अवांतर खर्च कशासाठी?
- राज्यातल्या एका जिल्ह्याच्या विद्यार्थ्याला दुसऱ्या जिल्ह्यातलं परीक्षा केंद्र का दिलं जातं?
- एका पदासाठी अनेक दिवस परीक्षा का होत राहतात. त्यातही एकाच पदासाठी दिवसातून दोन शिफ्टला परीक्षा?
- परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका, आन्सर की का मिळत नाही?
- निकाल वेळेवर का लागत नाहीत आणि अनेक परीक्षांच्या निकालात तफावत का वाटते?

महापोर्टल बंद करा : सुप्रिया सुळे
राज्य सरकारतर्फे शासकीय नोकरभरतीसाठी सुरु करण्यात आलेले 'महापोर्टल' बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. "महायुती सरकारच्या काळात ही पोर्टल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, दौऱ्यांच्यानिमित्ताने राज्यभरात फिरताना अनेक विद्यार्थ्यांनी महापोर्टलविषयी आपल्याकडे तक्रार केली होती. राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात आंदोलन झाले होते. त्यावेळी अनेक युवकांनी आपल्याला भेटून महापोर्टल बंद करण्याची मागणी केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. मागील सरकारने सुरु केलेले हे महापोर्टल बंद करुन पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परिक्षा घेण्यात यावी," अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या

महापोर्टल सेवा बंद करुन पूर्वीप्रमाणेच परीक्षा घ्यावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MahaPortal | नोकर भरतीसाठी वापरलं जाणारं महापोर्टल बंद करा, विद्यार्थ्यांची मागणी | ABP Majha

महापरीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या वनरक्षक भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ?