मुंबई : माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नाही. ट्विटर हॅण्टलवरील बायोमधून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. शिवाय पंकजा मुंडे यांनी काल (1 डिसेंबर) फेसबुक पोस्ट लिहून, 12 डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे 12 डिसेंबर रोजी काय सांगणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परळी मतदारसंघात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला.

पंकजा सध्या कोणत्याही सभागृहाच्या प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांनी भाजपचा उल्लेख काढला असवा असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेही यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन अशाचप्रकारे उल्लेख काढला होता. तेव्हाही अशीच चर्चा रंगली होती.

पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल : संजय राऊत
पंकजा मुंडेच काय, तर राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल, असंही राऊतांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या कालच्या फेसबुक पोस्ट आणि आज ट्विटर हॅण्डलवर भाजपचा उल्लेख नसल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट