रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील 'रत्नागिरी गॅस आणि विद्युत' प्रकल्पातील कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या मशिनचे पार्ट चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


या प्रकल्पातील पॉवर ब्लॉकमधील टर्बाईन रोटरचे काढून ठेवलेले तब्बल सहा ब्लेड चोरीला गेले आहेत. चोरलेले हे पार्ट भंगारात विकण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर गुहागर जवळच्याच पालपेणे गावातील जंगली भागात हे पार्ट लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाच्या पॉवर ब्लॉकमध्ये तीन टर्बाईन आहेत. त्यामध्ये 2  A, 2 B असे प्रत्येकाचे दोन-दोन रोटर आहेत. या टर्बाईनच्या देखभालीचे  काम जीइ या कंपनीकडे आहे. गेल्या महिन्यात टर्बाईनची दुरुस्ती झाल्यानंतर टर्बाईन मधील रोटरचे काढलेले ९२ ब्लेड पॉवर ब्लॉकमधील रूमच्या मागे ठेवण्यात आले होते. जीइचे अभियंते कंपनीत पुन्हा कामावर आल्यानंतर त्यांना ९२ पैकी ८६ ब्लेड दिसले.

गुरुवार रात्रीपासून कंपनीत या ब्लेडचा शोध सुरु होता. यातील एका ब्लेडची किंमत २० ते २५ लाखाच्या घरात असावी असा प्राथमिक अंदाज आहे. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पात झालेल्या या चोरी विषयी कंपनीकडून कोणतीच माहिती दिली जात नव्हती. पण आज गुहागर जवळच्या पालपेणेच्या जंगलात हे पार्ट आढळून आले आहेत.

प्रत्यक्ष कंपनीच्या आवारातील इतके महत्वाचे पार्ट कंपनीची इतकी मोठी सुरक्षा भेदून बाहेर आलेच कसे? हा सवाल आता उपस्थित होतो आहे.

या कंपनीच्या चारही बाजूला सीआयएसएफच्या बंदुकधारी रक्षकांचं मोठं कडं असतं. ही सगळी सुरक्षा यंत्रणा तोडून कंपनीच्या इतक्या महत्वाच्या भागाचे सहा पार्ट चोरीला कसे गेले हा मोठा प्रश्न आहे. कंपनीच्या आणि सुरक्षा यंत्रणेच्या संगनमताशिवाय हे काम होऊच शकत नाही हे उघड आहे. आज गुहागर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी कारवाई करत हे पार्ट जंगलातून ताब्यात घेतले आहेत. देशाच्या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पातील ही यंत्रणा अशा पद्धतीने बाहेर गेल्याने येथील सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.