सोलापूर : "भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष आहे. पक्षाला मोठे करणारे बहुजन नेते अडगळीत गेले आहेत. तर गडकरी, जावडेकर, गोयल सत्तेत मिरवत आहेत", असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.
याशिवाय पुण्यातील गुंड बाबा बोडके प्रकरणात मुख्यमंत्री खोटं बोलत असून, वर्षा बंगल्यावर त्या दोघांची भेट झाल्याचा दावा अजित पवारांनी केला.
माढा तालुक्यातील पिंपळनेर इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
शेटजी-भटजींचा पक्ष
अजित पवार म्हणाले, "भाजप हा शेटजी- भटजींचा पक्ष आहे, असं मी लहानपणी ऐकायचो. मात्र ज्या बहुजन नेत्यांनी या पक्षाला चेहरा दिला, तीच मंडळी आता सत्ता आल्यावर अडगळीत पडली आहेत. मुंडे, डांगे, फरांदे अशा व्यक्तींनी भाजपला बहुजन चेहरा दिला. मात्र सत्ता आल्यानंतर ते अडगळीत पडले आणि सध्या सत्तेत गडकरी, जावडेकर, प्रभू आणि पियुष गोयल यासारखी मंडळी मिरवत आहेत. त्यामुळे भाजप केवळ बहुजन समाजाचा वापर करून घेत आहे ".
मोदी आणि फडणवीस यांनी फुले, शाहू, आंबेडकरांची विचारसरणी खुंटीला टांगून ठेवल्याचा आरोप, अजित पवारांनी केला.
मुख्यमंत्र्यांमुळे पश्चिम महाराष्ट्राला फटका
या सरकारचा सगळ्यात मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसल्याचा दावा अजित पवारांनी केला.
मुख्यमंत्री आणि इतर मंत्री विदर्भातील आहेत. त्यामुळे ते पश्चिम महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सोलापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात कोणीच खमक्या मंत्री नसल्याने हे कोणीच या सरकारवर जोरात बोलू शकणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.
मराठा मोर्चा, अॅट्रॉसिटी
यावेळी अजित पवारांनी मराठा मोर्चा आणि अॅट्रॉसिटीवरुन सरकारवर निशाणा साधला. अॅट्रॉसिटीतील चुकीच्या तरतुदी काढून, त्यात दुरुस्ती करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी योग्य असल्याचा दावा अजित पवारांनी केला.
संबंधित बातम्या
निवडणुकीत नागराज मंजुळेंसारखं दिग्दर्शन कराः अजित पवार