चंद्रपूर: मराठा-कुणबी हा समाज एकच असला, तरी ओबीसी अंतर्गत कुणबी समाजाला मिळत असलेल्या आरक्षण कोट्यात मराठा समाजाचा समावेश नको, अशी प्रतिक्रिया आज चंद्रपूरच्या मराठा मोर्चात समावेश झालेल्या कुणबी मराठ्यांनी दिली.


मराठा आमचेच आहेत, पण त्यांना कुणबी व्यतिरिक्त स्वतंत्र आरक्षण द्या, अशी मागणी करण्यात आली.

आधीच ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश असल्यानं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जावं, असं काहींचं मत आहे. तर काही जणांनी ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ठ केलं जावं, अशीही मागणी केली आहे.

रविवारी निघालेल्या ठाण्यातील मोर्चात मराठा समाजाला कुणबी म्हणून जातप्रमाणपत्र मिळावीत, अशी मागणी केली गेली होती. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली आहे.

चंद्रपूर मोर्चातील काही प्रतिक्रिया

1 ) मराठा कुणबी म्हणून आरक्षण मागत असले, तरी त्यांचे आरक्षण कुणबी आरक्षणातून नको. तसंच ओबीसी आरक्षणाच्या सध्याच्या कोट्यातूनही नको.

2) मराठा समाजाला आरक्षण द्या, पण स्वतंत्र द्या. कुणबी किंवा ओबीसीमधून नकोच. त्यामुळे गोंधळ निर्माण होईल.

3) मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास समर्थन, पण आरक्षण हे कुणबी आरक्षण टक्केवारीतून नको

4) मराठा कुणबी एकच, पण ओबीसी कुणबीच्या आरक्षणाला धक्का नकोच. आता ओबीसीमध्ये नवीन जात नको. आधीच यामध्ये 350 जातींचा समावेश आहे.

5) वरिष्ठ जे ठरवतील ते मान्य.

6) मराठा आमचेच पण कुणबी व्यतिरिक्त आरक्षण द्या.