मुंबई : "राज्यपालांसोबतची भेट ही राजकीय नसून सदिच्छा भेट आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितल्यानंतर, संजय राऊत आज (4 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. तसंच तरुण भारत वृत्तपत्र वाचत नसल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.
"राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वेळ आम्ही घेतली आहे. ही सदिच्छा भेट आहे. राज्यपाल हे आपल्या सगळ्यांचे पालक आहेत. त्यांना शुभेच्छा देणार आणि आशीर्वाद घेणार आहे. या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहता सदिच्छा भेट म्हणून पाहावं. कोश्यारी हे अनुभवी नेते आहेत. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे. आम्हीही त्यांच्यासोबत काम केलं आहे. निवडणूक झाली, निकाल आला, यादरम्यान त्यांची भेट होऊ शकली नाही. मी उद्धव ठाकरेंशी बोललो आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच," असं संजय राऊत म्हणाले.
'तरुण भारत वृत्तपत्र आहे हे माहित नाही'
'सामना'तून भाजपवर होणाऱ्या टीकेला 'तरुण भारत' वृत्तपत्रातून उत्तर देण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्री काही वृत्तपत्र वाचत नाहीत, तसंच मी 'सामना'शिवाय दुसरं काही वाचत नाही. एवढी वृत्तपत्र येतात, कुठे वाचणार. अशाप्रकारचं वृत्तपत्र आहे हे मला माहित नाही."
तरुण भारतमध्ये संजय राऊतांवर टीका
उद्धव ठाकरेंची राजकीय समज, त्यांची परिपक्वता, समंजसपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडकीने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना हा बेताल शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांना वेदनादायी आहे. या एका 'बेताल'च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणला येईल?
रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी 9 वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवश मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?
संजयने दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे, पण संजयच धृतराष्ट्र होणार असेल तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राने चिंतीत होणं स्वाभाविक आहे. 'बेताल' जर खांद्यावरुन उतरला नाही, तर सिंहासन बत्तीशीच्या कथाच तेवढ्या शिल्लक राहतील. अर्थात ज्या फांदीवर बसलो आहोत, कापणाऱ्याला लाकूडतोड्या नाही तर 'शेखचिल्ली' म्हणतात, याचं भान शिवसेनेला असेलच.
राज्यपालांकडे ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Nov 2019 10:25 AM (IST)
महाराष्ट्रातल्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार यावरुन आधीच रणकंदन माजलेलं असताना, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज राज्यपालांना भेटणार आहेत. भाजपवर दबाव वाढवण्य़ासाठी राऊतांचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -