मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा (4 नोव्हेंबर) दिवस महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज एकाच दिवशी दिल्लीत आहेत. अवकाळी पाऊसग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत. अर्थात या भेटीत राजकीय चर्चा होईलच. तर दुसरीकडे शरद पवारांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत राज्यातील सद्य परिस्थितीवर बातचीत करतील. परिणामी या दोन्ही नेत्यांच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


विधानसभा निवडणुकीच्या निकालाला दहा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्र्यांची अमित शाहांसोबतची ही पहिलीच दिल्ली भेट आहे. आज सकाळी 11 वाजता दोन्ही नेत्यांची होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ निधीतून जास्तीत जास्त आणि तातडीची मदत मिळण्यासाठी भेट आहे. सोबतच या बैठकीत राज्यातील राजकीय सद्यस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळायला हवी : उद्धव ठाकरे

राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीलाही विशेष महत्त्व आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीच्या सत्ता स्थापनेचं घोडं अडलं असतान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. "शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील चर्चेतून पुढे काय निष्पन्न होतं त्यावर पुढचा निर्णय अवलंबून राहिल," असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं होतं.

विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटले आहेत. शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहे. मात्र सत्तास्थापनेवरुन दोन्ही पक्षांमधील संघर्षामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेना करत आहे. मात्र शिवसेनेची ही मागणी भाजपला मान्य नाही. त्यामुळे आता शिवसेना-भाजपचं राज्यात सरकार पुन्हा येणार की कोणती नवी समीकरणं जुळणार याचं चित्र आजच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या