नवी दिल्ली : राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीत जाणार आहे. उद्या सकाळी 11 मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट होणार आहे. एनडीआरएफ निधीतून जास्तीतजास्त आणि तातडीची मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री अमित शाहाची भेट घेणार आहे. या बैठकीत राज्यातील राजकीय सद्यस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या बैठकीत राज्याच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.


विधानसभेचा निकाल लागून आज 10 दिवस उलटले आहे. शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहे. मात्र सत्तास्थापनेवरुन दोन्ही पक्षांमधील संघर्षामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेना करत आहे. मात्र शिवसेनेची ही मागणी भाजपला मान्य नाही.


VIDEO | सरकार बनवण्याचा पेच लवकर सुटेल : मुख्यमंत्री



शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी तर म्हटलं आहे की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी दादरमधील शिवतीर्थावर होईल. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सडेतोड शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहे. यावेळी ते भाजपवर निशाणा साधतानाही दिसत आहेत. याबाबत भाजपने उघड नाराजी व्यक्त केली आहे. मात्र शिवसेना माघार घ्यायला तयार नसल्याचं दिसून येत आहे.


दुसरीकडे शिवसेना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्तुती करताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. मात्र शिवसेनेने या चर्चांचं खंडण केलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेबाबत काही वेगळ्या समीकरणांवर चर्चा होऊ शकते आणि त्यातून काही वेगळा मार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महसूल आणि वित्त ही महत्त्वाची खाती शिवसेनेला देऊन त्यांची नाराजी दूर करता येईल, याची चाचपणी भाजपकडून केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे.


VIDEO | शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतीर्थावर शपथविधी : संजय राऊत