पंढरपूर : सध्या 115 टीएमसी पाण्यासाठी केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असून केवळ 7 टीएमसी एवढ्याच नीरा भीमा स्थिरीकरणाचे कामं करीत आहे . या प्रकल्पातून कोणत्याही दुष्काळी भागाचा फायदा होणार नसून केवळ एका मोठ्या नेत्याच्या तालुक्याला हे 7 टीएमसी पाणी वापरण्यास मिळण्यासाठी जनतेची दिशाभूल सुरु असल्याचा गंभीर आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. या आरोपाचा रोख बारामतीकडे असून सध्या केवळ नीरेतील जादा होणारे पाणी उजनीत आणण्याची कामे अंतिम टप्प्यात आहे. तर मराठवाड्याकडे पाणी नेण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याचा आरोप मोहिते पाटील यांनी केला आहे. ही कामे पूर्ण होईपर्यंत हे जादाचे पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा शब्दात मोहिते पाटील यांनी बारामतीकरांना नथीतून तीर मारले आहेत.


वास्तविक या प्रकल्पात कृष्णेतून 1 थेंबही पाणी येणार नसून पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील दुष्काळी जनतेला मिळणारे हे पाणी पुन्हा एक स्वप्नच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुराचे पाणी दुष्काळी भागात आणले जाईल हे सांगणंही पूर्णपणे चुकीचे असून आताही सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी कर्नाटक आणि आंध्राकडेच वाहून जाणार असल्याचा दावा मोहिते पाटील यांनी केला आहे. मराठवाड्याला 21 टीएमसी पाणी देणे गरजेचे असताना, हे फक्त 7 टीएमसी पाणी देण्याचे प्रकल्प सुरु करीत असल्याने यामुळे मराठवाड्याची फसवणूक असून यातील 1 थेंबही पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला मिळणार नसल्याने यातून जनतेची फसवणूक सुरु असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. वास्तविक विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकल्पाची उघड चेष्टा सुरु करीत बासनात गुंडाळून ठेवला. याचसाठी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी अकलूजच्या सभेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा शब्द मोहिते पाटील यांना दिला होता .


पाहा व्हिडीओ : सांगली-कोल्हापुरातील पुरावर नियंत्रण मिळणार,50 किमीचा अजस्त्र बोगदा,कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना!



या प्रकल्पाला पाणी वाटप लवादाची मान्यता नसल्याचे कारण पुढे केले जात असले तरी या सरकारने कधी चांगला वकील देऊन बाजू न मांडल्याचे आरोप मोहिते पाटील करीत आहेत . याशिवाय राज्यपालांच्या अनुशेषाचा निकषामुळेही याच्या पहिल्या चार टप्प्यांची कामे होत नसल्याच्या आक्षेपाला उत्तर देतांना यासाठी वेगळ्या मार्गाने निधी उभारणे शक्य असल्याचे मोहिते पाटील यांचं सांगणं आहे. गेल्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तयारी केली होती, असे सांगताना केंद्र सरकारकडे जाऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याची धमक आघाडी सरकारमध्ये नसल्याचा टोला लगावला. हा प्रकल्प सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न न झाल्यास सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील 31 दुष्काळी तालुक्यातील जनतेसह मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे.


काय आहे कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे मूळ प्रकल्प?


पावसाळ्याच्या काळात महापुरामुळे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यात वाहून जाणारे 115 टीएमसी पाणी दुष्काळी 6 जिल्ह्यातील 31 तालुक्यासाठी द्यायचे. यात कुंभी नदी - 3 टीएमसी, कासारी नदी - 7 टीएमसी, वारणा नदी - 37 टीएमसी, कृष्णा-कोयना - 51 टीएमसी, पंचगंगा नदी - 10 टीएमसी आणि नीरा नदी उद्धटपर्यंत 7 टीएमसी असे एकूण 115 टीएमसी वाया जाणारे पाणी 31 तालुक्यातील दुष्काळी भागाला देऊन कायमस्वरूपी दुष्काळ हटविण्याची योजना आहे. याचे सहा टप्पे असून राज्य सरकारने थेट सहाव्या टप्प्यातील नीरा नदीतील 7 टीएमसी पाणी आणण्याचे काम सुरु करून कृष्णा भीमा स्थिरीकरण करीत असल्याची दिशाभूल सुरु केल्याचा आरोप मोहिते पाटील यांनी केला आहे.