जालना : काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. त्यांच्या या दाव्याने महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. निधी वाटपाबाबत काँग्रेसच्या आमदारांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. याबाबत राज्यातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांशीही बोलणं झालं आहे. मात्र, अद्याप काही न्याय मिळाला नसल्याची भावना गोरंट्याल यांनी व्यक्त केली. लवकर सोनिया गांधींचीही भेट घेणार असल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.


जालना शहरासह मतदारसंघातील विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली. निधीसाठी काँग्रेसच्या 11 आमदारांनी पाठपुरावा केला. मात्र, मागणीनुसार निधी काही मिळत नसल्यामुळं काँग्रेसमधील आमदार नाराज आहेत.


नाराजीचे कारण


जालना जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात तीन नगरपालिका आहेत. यामध्ये अंबड, परतूर आणि जालना आहेत. जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी आतापर्यंत 29 कोटी रुपयांचा निधी आला होता. मात्र. काँग्रेसच्या नगरपालिकांना या निधीतून दमडीही दिली नसल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबतीत शिवसेना नेते जिल्हा प्रमुखांच्या बाबतीत नरमाईचे धोरण बाळगत निधीसाठी एका लेटरवर सुद्धा शिवसेना नेत्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं.


पार्थ यांच्यावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नकार; म्हणाले...


पुढचं पाऊल


दरम्यान आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील पक्षश्रेष्ठींशी बोलणं झालं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कानावर घातलं असल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. मात्र, अद्याप आम्हाला न्याय मिळाला नसून लवकरच काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचंही गोरंट्याल यांनी सांगितलं. आगामी विधानसभा अधिवेशनात माझ्यासह सर्व 11 आमदार उपोषणाला बसणार किंवा सभात्याग करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


यापूर्वी कैलास गोरंट्याल यांनी आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. ज्यात त्यांनी मंत्रिपदी आपला विचार केला नसल्याचे सांगितलं होतं. दरम्यान यापूर्वी त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं होतं. आता यावेळी काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Congress Hunger Strike | महाविकास आघाडीत काँग्रेसचे 11 नाराज आमदार उपोषणाला बसणार- कैलास गोरंट्याल