West Maharashtra Bjp MLA Meeting : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विभागानुसार भाजप आमदारांच्या बैठका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. काल रात्री (8 ऑगस्ट) फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्रातील (West Maharashtra) भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला आहे. तसेच जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकिट देणार असल्याचं सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची धाकधूक वाढली आहे. 


महायुतीच्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा, फडणवीसांच्या सूचना


देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेल असंही त्यांनी आमदारांना सांगितलं आहे. लोकसभेत ज्या ज्या मुद्यांवर फटका बसला, त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, याबरोबरच शेतमालाचा भाव यावरही आमदारांसोबच फडणवीसांनी चर्चा केली आहे. लाडकी बहिण, युवा प्रशिक्षण या योजना प्रत्येक गावात पोहोचवा. महायुतीच्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळं आता आमदारांची धाकधूक वाढली आहे. 


बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील कोण कोणते आमदार उपस्थित?


देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला  दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे आमदार राम सातपुते, भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार आश्विनी जगताप, पुणे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनिल कांबळे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर, पर्वती विधनसेभेच्या आमदार माधुरी मिसाळ,  दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूरचे आमदार विजय देशमुख आणि सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. 


20 ऑगस्टपासून सातही विभागमध्ये महायुतीचे दौरे सुरु होणार


दरम्यान, राज्यात महायुतीचे समन्वय मेळावे आणि संवाद दौरे होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 20 ऑगस्टपासून सातही विभागमध्ये दौरे सुरु होणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला, नेमकं कसं असणार नियोजन? रात्री झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?