Kolhapur News : कोल्हापूर शहरातील महाभयंकर अवस्था पाहून उद्या 31ऑक्टोबर रोजी रिक्षांसह घेराव घालण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


शहरातील महापालिकेचे 62 आणि कंत्राटदारांची जबाबदारी असलेल्या 60 अशा एकूण 122 रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती केली जाणार असून मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत आंदोलकांना त्याबाबत वेळापत्रक देण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी महापालिकेला रिक्षांसह घेराव घालण्याचे आंदोलन मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले.  


शहरातील रस्ते अतिशय खराब झाले असून, ते त्वरित दुरुस्त व्हावेत, यासाठी रिक्षाचालकांनी सोमवारी महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात महापालिकेचे प्रभारी प्रशासक व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी आंदोलक आणि महापालिका अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. 


रस्त्यांबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांना थोडी तरी जाण आहे का? त्यांना कशाचेच सोयरसूतक नाही. बाहेरून आलेल्या लोकांना खड्डे दाखवायचे का? हेच कोल्हापूरचे पर्यटन आहे का? शहरात किती रस्ते आहेत, त्यावर किती खड्डे आहेत, याची तरी अधिकार्‍यांना माहिती आहे का? आमचा उद्रेक, त्रागा समजून घ्या, असे सांगून बाबा इंदुलकर यांनी रस्ते कामाचा दर्जा तपासण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.


कोल्हापूर पोलिस आणि मनपाचा 'तालिबानी' निर्णय


खड्ड्यात पडून, रस्त्यावर चिरडून मरा पण आम्ही बांधील नाही, अशी मानसिकताच कोल्हापूर पोलिस आणि महानगरपालिकेनं केली आहे का? अशी परस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी रिंगरोडवर खड्ड्यात पडून महापालिकेतील अभियंत्याचा आईचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी मात्र आईच्या मृत्यूस मुलाला कारणीभूत ठरवून गुन्हा दाखल केला आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे लोकांनी चिरडून, रस्त्यावरील खड्ड्यात  मेलं तरी, चालेल आम्हाला अजिबात विचारणा करायची नाही, असा प्रकारची तालिबानी वृत्ती कोल्हापूरमध्ये राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे का? अशी शंका येते. 


अभियंत्याची आई रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी घडली होती. यानंतर एबीपी माझाने या प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडताना यासंदर्भात आवाज उठवताना 28 ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने अवघ्या 24 तासांच्या अपघात झालेल्या रस्त्याचे काम सुरु केले होते. एवढी तत्परता जर अपघात होण्यापूर्वीच दाखवली असती, तर  त्या अंभियंत्याच्या आईचा जीव वाचला नसता का? याचा विचार कोल्हापूर पोलिस आणि मनपा प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनी करण्याची गरज आहे.