Aurangabad Farm News: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र अशातच औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील थेरगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने पारंपारिक पिकांना फाटा देत पपईतून (Papaya) लाखोंचा उत्पन्न घेण्याची किमया केली आहे. त्यामुळे शेतीला जिद्द आणि परिश्रमाची जोड मिळाली तर शेती वरदान ठरू शकते, हे यातून पुन्हा एकदा समोर आले आहे. अमोल कृष्णा ताकपी असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. 


पारंपारिक पिकांना फाटा देत सध्या अनेक शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आधुनीक तंत्रज्ञान, नविन पिके यामुळे शेती व्यवसायाला नवे रूप मिळू लागले आहे. असाच काही प्रयोग पैठणच्या थेरगाव येथील अमोल ताकपीर याने प्रत्यक्ष कृतीत उतरविला आहे. अमोलने पारंपारिक पिकांना फाटा देत अवघ्या दोन एकर पपई लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 


धीर सोडला नाही...


गतवर्षीही थेरगाव मधील अनेकांनी पपईची लागवड केली होती. परंतु, शेतकऱ्यांचे फळबागासह खरिप पूर्ण वायाला गेले होते. तर निम्मे झाडे पाण्याने खराब झाली होती. वाचलेल्या झाडावरील अर्धी फळे उन्हाने खराब झाले होते. अशात पपईला कोणी विचारानासे झाले होते. त्यामुळे लावलेला खर्च निघत नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी पपईची बाग स्वतः उध्वस्त केली. गेल्यावर्षीचा अनुभव पाहता पाचोड, थेरगाव, मुरमा, लिंबगावसह परिसरातील शेतकरी पपईचे लागवड करण्यास धजावत नव्हते. परंतु, अमोल ताकपीर परिस्थिती समोर हतबल झाला नाही. त्याने दोन एकर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत यंदा सात बाय सहावर पपईच्या दोन हजार झाडांची लागवड केली. आता या पिकातून त्याला पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्याच्या यशस्वी प्रयोगाची परिसरात चर्चा असून, त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. 


पारंपारिक पिकांना फाटा...


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये कापूस,सोयाबीन, मका आणि बाजरीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अशात आता शेतकरी हतबल झाले आहे. त्यामुळे दरवर्षी पारंपारिक पिकांसोबत जोडीला इतर पिकांची साथ असल्यास त्यातून थोडीफार आर्थिक उत्पन्न होण्याची शक्यता असते. असाच काही प्रयोग अमोलने करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश देखील मिळाले आहे. 


Marathwada: सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; मदतीसाठी हवेत 2500 कोटी