ठाणे : एकीकडे आपल्या वडिलांच्या प्रशासकीय आणि राजकीय संबंधांचा दबाव टाकून, गैरमार्गाने खोटे प्रमाणपत्र मिळवून आएएस अधिकारी बनल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. मात्र, दुसरीकडे भाजीविक्रेत्या आईने (Mother) आपल्या मुलास सीए बनवून समाजात आदर्श निर्माण केल्याचंही उदाहरण यानिमित्ताने पाहायला मिळालं. डोंबिवलीमधील (dombivali) एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सी.ए. परीक्षा पास झाला असून आपण सीए झाल्याची गोड बातमी घेऊन तो आई भाजी विकत असलेल्या ठिकाणी पोहोचला. यावेळी, मुलाने आईला मारलेली मिठी, आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू पाहून अनेकांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. माय-लेकाच्या या भेटीचा क्षण, गरीबांच्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सा.बां.मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनीही व्हिडिओ पाहून माय-लेकाचं अभिनंदन केलंय.  


मायलेकाच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून योगेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. योगेशची आई ज्या ठिकाणी भाजी विकते, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. जिद्द ,कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टीमुळे योगेशने सुद्धा आपल्या आईच्या कष्टाचं चीज केलं आहे. योगेशने सीए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली. हे सर्व दृश्य पाहून आजूबाजूच्या नागरिकांचे सुद्धा डोळे पाणावले होते. योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील खोनी गावांमध्ये राहतो. योगेशची आई निरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात. गेल्या 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकत आहेत. विशेष म्हणजे हा भाजीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी दोनशे रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. मात्र, मुलाने मोठं शिक्षण घेऊन आज त्यांच्या कष्टाचं चीज केलं. आपला योगेश सीएची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर निरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. 


बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी हिमतीने घर,संसार सांभाळत लेकाला शिकवलं. पतीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आली होती. मात्र, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी हार न मानता मुलाला शिक्षणसाठी सर्वोतोपरी बळ दिलं. पतीचे निधन झाल्यावर घरातील नातेवाईकांनी घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी जिद्द सोडली .नाही पदरी दोन मुलं आणि एक मुलगी या सर्वांचा सांभाळ करुन मुलांचे उत्तम भविष्य घडवण्याचा निर्धार त्यांनी केला. आपल्या तीन मुलांसह मोठ्या जिद्दीने 25 वर्षे भाजी विक्रीचा व्यवसाय करून मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न करून दिले. हे करूनही ठोंबरे मावशी थांबल्या नाहीत, त्यांचा लहान असलेला योगेशला आज आईने मोठ्या कष्टाने सीए बनवलं आहे. भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी ठोंबरे मावशीचा संघर्ष जवळून पाहिल्याने मावशीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आईने घेतलेल्या कष्टायचे पांग फिटले, अशीच भावना अनेकांच्या मुखातून यावेळी बाहेर पडत आहे. 




व्हिडिओ व्हायरल


योगेशनेही सीए बनायचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास केला. मी रिझल्टची वाट बघत होतो, अखेर रिझल्ट समोर आला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ही गोड बातमी घेऊन मी आईकडे गेलो, तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत होती. मी आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे, याची मला कल्पना नव्हती. मात्र, व्हिडिओ पाहून अनेकांचे फोन सुरू झाले आहेत. तर, मोठ्या राजकीय नेत्यांनीही ट्विट केलं. 


माय-लेकाचा समाजापुढे आदर्श


मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता आज सीए झाला. योगेशने आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून अनेक जुने ग्राहक सुद्धा त्यांच्या मैत्रिणी ओळखीतले त्यांना शोधत आज त्यांच्या भाजीच्या दुकानात येऊन त्यांचं अभिनंदन करताना पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक नागरिक ठोंबरे मावशींकडून भाजी विकत घेतात आणि मुलगा सीए झाल्याच्या शुभेच्छाही देतात. या शुभेच्छांमुळे ठोंबरे मावशींच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळत असल्यचं चित्र आहे. विशेष म्हणजे कोणी पैसे देऊन, कोणी फुलं देऊन, तर कोणी चॉकलेट मावशींना शुभेच्छा देत आहेत.