Maharashtra MLC Election : विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 जागा असताना बारावा उमेदवार देत महाविकास आघाडीने मोठी खेळी केली होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीने बाजी मारताना सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच निवडणुकीत पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील बिघाडी समोर आली. मिलिंद नार्वेकर यांच्या पसंतीच्या मतांवरून सुद्धा काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये मतभेद झाल्याचे समोर येत आहे.
मिलिंद नार्वेकर यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आग्रही होते. दुसरीकडे जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केली नसल्याच्या भावनेतून उद्धव ठाकरे नार्वेकर यांच्या पाठीशी ठाम उभा होते. त्यामुळे जयंत पाटील यांचा प्राधान्यक्रम पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि काँग्रेसच्या आमदारांवर होता. मात्र, काँग्रेसचीच मते फुटल्याने जयंत पाटील यांना झटका बसला. मिलिंद नार्वेकर निवडून आले. मात्र, या दोन्ही उमेदवारांना पसंतीक्रमाने मतदान करण्यावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये खणाखणी झाल्याची माहिती समोर येत आहे.
आदल्यादिवशी काय घडलं?
निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्ये काँग्रेसची विश्वासार्ह आमदारांचा कोटा नार्वेकर यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न ठाकरे यांचा होता. त्यामुळे मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील? यावरून काँग्रेसमध्येच वरिष्ठ नेत्यांमध्ये दोन गट पडले. एका बाजूने काँग्रेसला फुटीची भीती होती. दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की जयंत पाटील यांना द्यायचा याबाबत काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाली होती.
काँग्रेसच्या रणनीतीला ठाकरेंकडून विरोध?
काँग्रेसच्या रणनीतीनुसार काँग्रेसला ज्या मतांवर अविश्वास होता अशी मते उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या कोट्यासाठी राखीव मते ठेवण्याचा विचार होता. मात्र, त्याला ठाकरेंकडून विरोध करण्यात आला. विधानपरिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसने ठाकरेंच्या बैठकीमध्ये मिलिंद नार्वेकरांना काँग्रेसकडून देण्यात येणाऱ्या मतांची यादी बदलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विश्वासार्ह मते नार्वेकर यांना मिळावी यासाठी पूर्ण प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून झाला होता. ठाकरेंच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. अन्यथा मिलिंद नार्वेकर यांची सुद्धा सीट धोक्यामध्ये होती.
दुसरीकडे, मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली. ज्यामध्ये ठाकरेंची 15 आणि काँग्रेसचे सात मते मिळाली. 23 च्या कोट्यामध्ये नार्वेकर यांच्यासाठी अपक्ष आमदाराचे मत सुद्धा ठेवण्यात आलं होतं. दुसरीकडे उर्वरित मते जयंत पाटील यांना मिळायला हवी होती. मात्र ती मिळाली नसल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झालं आहे. काँग्रेसची सात ते आठ मते फुटल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ठरलेल्या रणनीतीनुसार महाविकास आघाडीला तिन्ही उमेदवार निवडून आणले नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या