Raju Shetti on Nandani Elephant: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी हत्ती वनविभागाने घेऊन जावे, या आशयाचे 2018 मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे पत्र सोशल मिडीयात व्हायरल केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर सडकून टीका केली होती. वनताराला माधुरी गेल्याने त्यांनी मुकेश अंबानींवर हल्लाबोल केला होता. यानंतर आता त्यांचे सात वर्षांपूर्वीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी खुलासा केला. माहुत नसल्याने विश्वस्तांनी येऊन हत्तीच्या देखभालीसाठी गडचिरोलीतील वनविभागाकडे रवानगी करण्यात यावी, अशी विनंती केली होती, असे शेट्टी यांनी सांगितले. मात्र, इस्माईल या माहुतास अथक प्रयत्नातून नांदणी मठाच्या विश्वस्तांनी शोधून आणले आणि त्यांनी आतापर्यंत काळजी घेतली असल्याचे शेट्टी म्हणाले.
काय वस्तुस्थिती आहे या पत्राची?
राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, 2018 साली नांदणी मठातील हत्तीची देखभाल करणारा नागाप्पा हा माहुत हदयविकाराच्या तीव्र झटक्याने आजारी पडल्यानंतर डॅाक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. त्यामुळे माधुरीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षित माहुत नसल्याने नांदणी मठाचे विश्वस्त माझ्याकडे येवून माहुत मिळेपर्यंत काही दिवसासाठी सदरचा हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्तीकेंद्रात सोडण्याबाबत विनंती केली. त्यानुसार मी 2018 साली वनविभागास पत्रव्यवहार केला. मात्र, वनविभागाने या गोष्टीस असमर्थता दर्शवली. त्यानंतर थोड्या दिवसांनी इस्माईल या माहुतास अथक प्रयत्नातून नांदणी मठाच्या विश्वस्तांनी शोधून आणले. त्यादिवसापासून ते आजअखेर माधुरीची चांगल्या पध्दतीने देखभाल व काळजी घेतली गेली आहे. काही मंडळी खोडसाळपणाने राजकीय आकसापोटी माझे 2018 साली वनविभागास देण्यात आलेले पत्र आता सोशलमिडीयावर व्हायरल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आज अंबानींकडे पैसा व संपत्ती आहे म्हणून..
दरम्यान, माधुरीची रवानगी वनताराकडे झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी तोफ डागली आहे. शेट्टी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ज्यावेळी धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन करण्यात आलं आहे. आज अंबानींकडे पैसा व संपत्ती आहे म्हणून स्वत:च्या मुलाच्या स्वप्नासाठी वनतारा हे प्राणीकेंद्र उभारले. याठिकाणी पाळीव प्राणी इतर प्राण्यांना शिकाऊ करण्यास मदत होते, म्हणून न्यायव्यवस्थेलाही बटीक करून वर्षानुवर्षे सुरू असलेली जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला. संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या 1200 वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात असताना पैसा, सत्ता व संपत्ती समोर अण्णा भाऊ साठे यांच्या मताप्रमाणे न्यायव्यवस्थाही काहीकांची रखेल झाली हे खरं आहे. आता माधुरीसाठी न्याय मागायचे कुणाकडे?
इतर महत्वाच्या बातम्या