Raju Shetti on Elephant: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणीमधील  गेल्या साडे तीन दशकांपासून जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेल्या महादेवी मठाच्या महादेवी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर  वनताराकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र, यावेळी नांदणीमध्ये प्रचंड विरोध झाला. शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून या निर्णयाचा विरोध केला. मात्र, अखेर महादेवी हत्तीणीची वनताराकडे गेली आहे. यावेळी महादेवी हत्तीणीला सुद्धा अश्रु अनावर झाल्याने अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. दरम्यान, वनताराकडे महादेवी गेल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. 

धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून... 

राजू शेट्टी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ज्यावेळी धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन करण्यात आलं आहे. आज अंबानींकडे पैसा व संपत्ती आहे म्हणून स्वत:च्या मुलाच्या स्वप्नासाठी वनतारा हे प्राणीकेंद्र उभारले. याठिकाणी पाळीव प्राणी इतर प्राण्यांना शिकाऊ करण्यास मदत होते, म्हणून न्यायव्यवस्थेलाही बटीक करून वर्षानुवर्षे सुरू असलेली जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला.  संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या 1200 वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात असताना पैसा, सत्ता व संपत्ती समोर अण्णा भाऊ साठे यांच्या मताप्रमाणे न्यायव्यवस्थाही काहीकांची रखेल झाली हे खरं आहे. आता माधुरीसाठी न्याय मागायचे कुणाकडे?  

दुसरीकडे, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण सोमवारी रात्री गुजरातकडे रवाना झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यामुळे हत्तीणीला नांदणी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत हत्तीणीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षक मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. हत्तीणीला दोन आठवड्यात पाठविण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात मठ संस्थानने याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीकडे सोमवारी सकाळपासूनच सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दुपारी न्यायालयाने मठाची याचिका फेटाळली. 

महादेवीच्या डोळ्यातून अश्रू

चार वर्षाची असताना कर्नाटक येथून महादेवीला नांदणी येथे आणले होते. 2020 पासून न्यायालयीन लढाई सुरू होती. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच नांदणी, जयसिंगपूर शहर परिसरात तिचा वावर होता. निशीदीपासून मठाकडे नेत असताना खुद्द महादेवीच्या डोळ्यातूनदेखील अश्रू ढळू लागल्याने पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. महादेवीचे पुढील काळात चांगले संगोपन व्हावे अशी भावना ठेवूया. आम्ही महादेवीला कधीच विसरणार नाही असं नांदणी पट्टाचार्य महास्वामी स्वस्तिशी जिनसेन भट्टारक यांनी सांगितले आहे.

नांदणी येथे पोलिस वाहनांवर दगडफेक, लाठीमार

दरम्यान, महादेवी हत्तीणीची मिरवणूक सुरू असताना अचानकपणे पोलिस वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आम्ही हत्तिणीला नेऊ देणार नाही, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली. यावेळी अचानकपणे पोलिस वाहनावर दगडफेक सुरू झाली होती. यानंतर पोलिसांनी 70-80 जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या