Malegaon Bomb Blast Case : मालेगाव शहर हादरवणाऱ्या 29 सप्टेंबर 2008 सालच्यात्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्षं पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. आता, तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात उद्या ( दि.31 ) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, ज्यांनी या स्फोटात आपल्या जवळच्यांना गमावलं त्यांच्या डोळ्यांत आजही आसवं आहेत. हमे इन्साफ मिलेगा, न्याय होगा..असे म्हणत त्यांच्या भेदरलेल्या आशाळभूत नजरा निकालाच्या प्रतीक्षेत आहे.
'ती' चिमुरडी वडापाव आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही....
मालेगाव शहराला हादरवणाऱ्या या बॉम्बस्फोटात त्यांनी आपली 10 वर्षीय चिमुरडी गमावली. भिक्खू चौकात ती चिमुरडी पाववडा आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही. बॉम्बस्फोट झाला हे कळलं पण आपली मुलगी घरी परत येईल अशी आशा लियाकत शेख या बापाला होती. मात्र थोड्याच वेळात दुसरा निरोप आला की, मुलगी फरहिन त्यात मृत्युमुखी पडली. वडील म्हणून पत्नीसह मी तिथे बघायला गेलो, मात्र मला मुलीला पाहू दिले नाही. त्या चिमुरडीचा एक छोटासा गोंडस फोटो हृदयाजवळ ठेवत आजही तिची आठवण काढणाऱ्या बापाला 'इन्साफ ' मिळेल आणि ज्यांनी म्हणून हा बॉम्बस्फोट घडवून आणला त्यांना सजा होईल, अशी अपेक्षा आजत्यांना आहे.
वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कडक कारवाई व्हावी
असेचएकयाअपघातातीलपीडित ट्रॅव्हल चालक शेख रफिक शेख मुस्तफा हे मुंबईला जायला निघाले होते. भिक्खू चौकात त्यांनी चहा घेतला अन् पान खावून मुंबईच्या दिशेने ते रवाना होणार होते. मात्र तेवढ्यात धमाका झाला अन् त्यांना आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचे कात्रण व फोटो दाखवत त्यांचे सासरे असलेले शेख इब्राहिम यांनी ही घटना सांगितली. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. जावई आणि मुलगी आम्हा वृद्ध सासू सासऱ्यांना सांभाळत होते. बॉम्बस्फोटाच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आमचे खुप हाल झाले. त्यानंतर आमचा नातू आता आम्हाला सांभाळत आहे. पण जावयाच्या मृत्यूनंतर जो त्रास आम्हाला झाला तो त्रास बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना झाला पाहिजे, तेव्हा आम्हाला न्याय मिळेल. अशी भावना शेख इब्राहीम यांनी डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या स्थितीत भावविवश होत व्यक्त केली. तर वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा मयत रफिक शेख यांच्या मुलाने देखील व्यक्त केली.
'इन्साफ होना चाहिए' ही आमची भावना- मौलाना अब्दुल कय्युम कासमी
तत्कालीन जमीयत उलेमा संघटनेचे मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनी या बॉम्बस्फोटानंतर मृत झालेल्या व गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयीन लढाईला मदत केली. शहरातील शांतता बाधित होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले. सुपारी फुटली तरी दंगे फसाद होईल, अशी परिस्थिती मालेगावात असतांना पोलीस प्रशासन व सरकारच्या आदेशाचे पालन करत आम्ही शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले..'इन्साफ होना चाहिए ' ही आमची भावना आहे..पुन्हा त्यांनी अशी कृत्ये करू नये म्हणून त्यांना सजा मिळणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनी व्यक्त केली.
ज्यांची स्कूटर वापरली गेली त्या प्रग्यासिंह ठाकूर यांचेसह कट रचणारे कर्नल पुरोहित, असिमानंद आदींसह त्यांचे सहकारी हे या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे वेगवेगळे पुरावे न्यायालयाकडे दिले आहे. हा कट कुठे रचला गेला, कोणी रेकी केला, आरोपींच्या लॅपटॉपमध्ये काय मिळाले, दूरध्वनी संवादात काय चर्चा झाली, याचे सगळे पुरावे एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे सादर केलेले आहेत. त्यामुळे आरोपींना नक्की सजा मिळेल. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे बॉम्बस्फोटानंतर सुरवातीच्या काळात वकील म्हणून ज्यांनी काम पाहिले त्या हमदानी इरफाना यांनी सांगितले. तर संविधान आणि न्यायालय यावर आमचा विश्वास आहे, नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया मालेगाव मध्यचे आजी- माजी आमदार यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
