मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रातला पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते. दरम्यान भारतात COVID -19 अर्थात कोरोनाचा हा देशातील तिसरा बळी ठरला आहे. याआधी कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय वृद्धाचा आणि दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
दरम्यान संबंधित रूग्णाला त्रास होऊ लागल्याने 8 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र काही दिवस उपचार घेऊन ते घरी परतले होते. दरम्यान ते पुन्हा एकदा दुबईला कामानिमित्त गेले होते. मात्र प्रवासादरम्यान त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.
कोरोनाग्रस्त रूग्णाचा प्रवास
6 मार्च - दुबईहून परत आले. त्यानंतर त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटत असल्याने ते स्थानिक डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांना संशय आल्यानं त्यानी हिंदुजा रूग्णालयात जाण्यास सांगितले.
8 मार्च- हिंदुजा रूग्णालयात तपासणीसाठी गेले.
12 मार्च - 12 मार्चपर्यंत उपचार सुरू होते. मात्र हिंदुजामध्ये अधिकच त्रास सुरू झाला आणि त्यानंतर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हा 12 मार्चला त्यांना कस्तुरबा रूग्णालयात कॉरेंनटाईन लक्षात ठेवण्यात आलं. त्यापाठोपाठ त्यांची घाटकोपरमधली सोसायटीचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं.
13 मार्च- त्यांची पत्नी आणि मुलगा यांना कॉरेंनटाईन करून टेस्ट करण्यात आलं तेव्हा ते दोघंही पॉझिटिव्ह आढळले.
17 मार्च- सकाळी त्यांचा कस्तुरबामधे मृत्य़ू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा दोघांवरही कस्तुरबामध्ये उपचार सुरू आहेत.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. राज्यात 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1063 होम क्वारंटाईन असून त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
- पिंपरी चिंचवड मनपा- 9
- पुणे मनपा- 7
- मुंबई -6
- नागपूर-4
- यवतमाळ-3
- नवी मुंबई-3
- कल्याण - 3
- रायगड-1
- ठाणे-1
- अहमदनगर-1
- औरंगाबाद- 1
- एकूण - 39
कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित
कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.
Special Report | लग्नाची तयारी झाली पण कोरोना आडवा आला! कोरोनाचे साईड इफेक्ट्स
संबंधित बातम्या :
Coronavirus | जगभरात 24 तासांत 600 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
Coronavirus | कोरोना व्हायरसचा भारतात पहिला बळी, कर्नाटकातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Coronavirus | कोरोना व्हायरसचा देशातला दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू