पुणे : ज्येष्ठ चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धपकाळाने राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या त्यांच्या स्नुषा आहेत. 80 च्या दशकात अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य केले. धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, थरथराट, अशी ही बनवाबनवी, झपाटलेला, दे दणादण चल रे लक्ष्या मुंबईला, खट्याळ सासू नाठाळ सून, खरं कधी बोलू नये, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, रंगत संगत अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये महत्वाच्या चरित्र भूमिका केल्या आहे.

जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे येथे त्यांचा जन्म झाला. जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी 'मोरूची मावशी' नाटकात मावशीची भूमिका साकारली. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या गाजल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत पोलिसांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत डॉ. हेमा कुलकर्णी, तर त्यांचा मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. मृणाल देव- कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून आहे.