Tukaram Mundhe :  आरोग्य विभागाचा आयुक्तपदाचा चार्ज घेताच आयुक्त तुकाराम मुंढे (Tukarama Mundhe) यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात हजर नसल्यास अशा डॉक्टरांना थेट निलंबित केले जाणार आहे. पुण्यात आरोग्य विभागाच्या या कारवाईदरम्यान डॉक्टर, नर्स सर्व उपस्थित असल्याने कारवाई टळली आहे. असं असलं तरीही यापुढे कार्यालयीन वेळेत रुग्णालयात उपस्थित नसणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (Medical Department), ग्रामीण रुग्णालय,  जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी धाडसत्र कारवाई सुरू केलं आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. 


तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यानंतर ते अॅक्शन मोडवर आले आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची सेवा करण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र काहीच दिवसात धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंनी कारवाईचा तडाखा लावला. त्यांच्या याच धडाकेबाज कामाची सध्या चर्चा होत आहे. 


ऑगस्ट 2020 मध्ये नागपूर पालिका आयुक्त पदावरून बदली करत कोणत्याही पदभाराविना मुंबईमध्ये दाखल झालेल्या आयएएस तुकाराम मुंढे यांना मानवी हक्क आयोगाच्या सचिव (State Human Rights Commission Secretary) पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरात त्यांची पुन्हा बदली करुन त्यांना आरोग्य विभागाची आयुक्त पदाची धुरा दिली आहे.


15 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत 14 बदल्या


आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. त्यांनी ज्या पदावर काम केले आहे, त्या पदावर त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या 15 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत 14 बदल्या होणारे तुकाराम मुंढे हे बहुधा राज्यातील पहिले प्रशासकीय अधिकारी असतील. मुंढेंची काम करण्याची पद्धत नेहमीच चर्चेत असते. त्यांची ओळख ही शिस्तबद्ध अधिकारी अशी आहे.