Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. अनिल देशमुख- नवाब मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला आधी तुरुंगात पाठवायचं हे त्यांनीच ठरवावं, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी मुंबईत केले आहे.  


यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की,  महाविकास आघाडीचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परबही आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झाली आहे.  


सोमय्यांनी जाहीर केलेल्या नेत्यांची यादी -


1. अनिल परब
2. संजय राऊत
3. सुजित पाटकर
4. भावना गवळी 
5. आनंद आडसुळ
6. अजित पवार
७. हसन मुश्रीफ
8. प्रताप सरनाईक
9. रविंद्र वायकर
10. जितेंद्र आव्हाड 
11. अनिल देशमुख
12. नवाब मलिक 






मी काही संजय राऊत नाही. चणेवाल्याकडे जाऊन दोन ट्रक रद्दीचे पेपर घेऊन जाणार. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचं नाव संजय राऊत सांगू शकले नाहीत. कुठे आहे वाधवान? अशी फडतूस नाटकं, नौटंकी उद्धव ठाकरे यांची माणसं करतात, आम्ही कागदपत्रांसह सांगतो. आता 12 नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काढू द्या. त्यांना ठरवू द्या कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचं, असे सोमय्या यावेळी म्हणाले.