ठाणे : ठाणे पोलिसांनी चेकमेट कंपनीवरील दरोड्याचा छडा अवघ्या दोन दिवसात लावला आहे. याप्रकरणी कंपनीच्या एक माजी आणि एक आजी कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यापासून 4 कोटी 19 लाख रुपये जप्त केले आहेत. अद्याप सुमारे 5 कोटी रक्कम हस्तगत करणं बाकी आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ठाणे पोलिस आयुक्त परवींदर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
मंगळवारी चेकमेट या कंपनीवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी तब्बल साडेनऊ कोटी रुपये लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी झटपट तपासाची चक्रं फिरवून 24 तासांच्या आत पहिली अटक केली होती. या अटकेनंतरच धागेदोरे मिळत गेले आणि पोलिसांच्या हाती यश आलं.
सर्व आरोपी नाशिक परिसरातील
दरम्यान अटक केलेले बहुतेक जण हे नाशिक परिसरातील असल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परवींदर सिंह यांनी दिली. खबऱ्यांची माहिती आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन, आरोपींपर्यंत पोहोचल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींनी दरोडा टाकल्यानंतर शहराबाहेर रक्कम वाटून घेतली आणि वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेल्याचं पोलिस म्हणाले.
दोन कर्मचाऱ्यांचा कट
साधारण दोन महिन्यांपूर्वी आकाश चव्हाण आणि उमेश वाघ या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी दरोड्याचा कट आखला, ज्यात या कंपनीच्या काही माजी कर्मचाऱ्यांनीही त्यांना साथ दिली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे नाशिक परिसरातील असून त्यांच्याजवळच्या 3 झायलो गाड्या आणि 3 कोटींची रक्कम पोलिसांनी जप्त केली.
जास्त पैसे नेण्यासाठी साधणं नव्हती
ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्यावेळी कंपनीत 25 ते 30 कोटींची कॅश होती. मात्र साधनं उपलब्ध नसल्याने चोरट्यांनी केवळ 9 कोटींची रक्कमचं लुटली. इतकी मोठी रक्कम असूनही कंपनीने कोणत्याही प्रकारे सुरक्षेचे उपाय योजले नव्हते, असंही पोलिसांनी नमूद केलं.
याप्रकरणात उर्वरित 10 आरोपींच्या शोधासाठी विविध राज्यात पोलिसांची पथक पाठवण्यात आली आहेत.
पहाटे दरोडा
बँकांमध्ये पैसे पुरवणाऱ्या चेकमेट प्रायव्हेट सर्विसेस या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला होता. तीन हात नाका परिसरात पहाटे 4 वाजता ही घटना घडली. या दरोड्यात 9 कोटी रुपये लुटले होते.