औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव येथे संतप्त जमावाने शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील पोलिस पाटील महिलेने त्रासाला कंटाळून विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी केळगावात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या दंगा काबू पथकाला हुसकावले. संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या दोन गाड्या फोडून जमाव आरोपींच्या घराची नासधूस करायला लागले.


जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. 4 हवेत फायर करण्यात आले. यावेळी एक अधिकारी तसेचं 3 कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांच्या दोन गाड्याही फोडण्यात आल्यात. या प्रकरणी 55 गावकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. प्रकरणातील संशयित आरोपी गावात नसल्यामुळे जमावाच्या तडाख्यातून वाचले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले.


त्यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. घटनेनंतर केळगावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.