मुंबई : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सर्वशक्तिमान देव शरद पवारांना दीर्घायु्ष्य देवो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना चांगले आरोग्य लाभो, असंही मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.





अजित दादा आणि पार्थ पवारांच्या बरोबर 12 वाजता शुभेच्छा


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना तसेच पार्थ पवारांनी आपल्या आजोबांना बरोबर 12 वाजता ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.





पार्थ पवारांनी म्हटलं आहे की, देशातील एका मोठ्या उंचीच्या नेत्याच्या शुभेच्छा, पवार साहेब खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण सर्वांसाठी प्रेरणा आहात, तरूणांना नेहमीच समाजसेवेसाठी मार्गदर्शन करत असता. आपणाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, असं पार्थ यांनी म्हटलंय.





शुभेच्छा देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.





शरद पवारांविषयी थोडक्यात
शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या कन्या आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1999 साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. पवारांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून देखील काम सांभाळले आहे. राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासह त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपद देखील सांभाळले आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्य सूत्रधार शरद पवार यांनाच मानले जाते.