पिंपरी चिंचवड : चुलत्यानेच अल्पवयीन पुतणीचा विनयभंग केला आणि नंतर वारंवार अश्लील मेसेज करू लागला. याच त्रासाला कंटाळून पुतणीने आत्महत्या केल्याचा आरोप आईने केलाय. पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणीनगर परिसरात 6 सप्टेंबरला ही घटना घडली होती. गुन्हा मात्र 11 डिसेंबर म्हणजे काल दाखल झाला. एप्रिल 2018 मध्ये पीडित मुलगी औरंगाबाद येथील काकाकडे सुट्टीसाठी गेली होती. तेंव्हा काकाने पुतणीला छेडलं. म्हणून ती लगेचच पिंपरी चिंचवडमधील तिच्या घरी परतली. मात्र काकाने तरी पिच्छा सोडला नाही. त्याने वारंवार अश्लील मेसेज करत त्रास देणं सुरूच ठेवलं. अडीच वर्षांपासून सख्खा काकाच अश्लील वर्तन करत असल्याने ती चांगलीच खचली होती. यातून नेमकी सुटका कशी मिळवायचा हा प्रश्न तिला अनेकदा भेडसावत होता. याचंच उत्तर शोधताना 6 सप्टेंबरला तिने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेतली असा आरोप आईने केलाय. त्यानंतर पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण दहा दिवसांनी तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. अवघ्या सतराव्या वर्षात मुलगी सोडून गेली, याचा मोठा धक्का कुटुंबियांना बसला होता.


या धक्क्यातून सावरायला जवळपास तीन महिने उलटले आणि मग पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठलं. आत्महत्येपूर्वी मुलीने लिहिलेली चिट्ठी त्यांनी पोलिसांनी दिली. यात एप्रिल 2018 पासून 6 सप्टेंबर 2020 पर्यंत तिला तिच्या काकाने कसा त्रास दिला, याबाबत उल्लेख होता. त्याअनुषंगाने आईने तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी ही तातडीनं गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा उशिरा दाखल झाल्याने भोसरी पोलिसांना तांत्रिक बाबींचा उलगडा करावा लागणार आहे.


पीडित मुलीचे आई-वडील आणि अश्लील वर्तवणूक करणारा काका हे औरंगाबादचे असून त्यांचा एकत्रित कुटुंब आहे. पीडितेचे वडील हे पिंपरी चिंचवडमधील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. म्हणून ते सध्या इंद्रायणीनगर येथे रहायला आहेत. पण शाळेला सुट्ट्या लागल्या की पीडित मुलगी विवाहित काकाकडे जायची. पण 2018 मध्ये काकाच्या मनात आलेल्या पापाने अखेर तिचा जीव घेतल्याचं आईच्या आरोपावरून तरी दिसतंय. भोसरी पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीनंतरच अटकेची कारवाई होणार आहे.