G1, G2 आणि G3 या तीन गटात 3 ते 4 तासांचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, मुंब्रा, भिवंडी, नाशिक या परिसरात लोडशेडिंग होत आहे. ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ आहे. त्यामुळे त्याप्रमाणात वीजनिर्मिती होत नसल्याने आता भारनियमन लागू झालं आहे.
काय आहेत भारनियमनाची कारणं?
- कोळशाच्या तुटवड्यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वीज निर्मिताला फटका
- कोयना जलविद्युत केंद्रात पुरेसा पाणीसाठा असला तरी, पाणीसाठा राखीव ठेवावा लागत असल्याने, अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा
- खुल्या बाजारात वीज महाग असल्याने आणि पुरेशी उपलब्धता नसल्याने विकत घेण्यात अडचणी
- शेजारच्या राज्यात निवडणुका तोंडावर असल्याने जास्त वीज त्या राज्यांमध्ये खर्च होत असल्याची सूत्रांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक
लोडशेडिंगवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. मुंब्र्यात आठ ते नऊ तास लोडशेडिंगनंतरही वीज नसल्याने, जाळपोळ आणि तोडफोड झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाडांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
“वीज नसल्याने कार्यकारी अभियंत्यांना फोन केला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद नाही. मुख्य अभियंत्यांनीही काहीच उपाय केले नाहीत. कुणाचा प्रतिसाद नाही, सतत लोडशेडिंग, अधिकारी फोन उचलत नाही, आमदारांच्या फोनला प्रतिसाद देत नाही” असा आरोप करत चिडलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी धमकी दिली.
तोंडाला काळ फासू असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. राज्यात पहिली जाळपोळ झाली तर ती माझ्याकडून, माझ्या मतदारसंघातून होईल. लोक स्थानिक आमदाराला म्हणजेच मला शिव्या देत आहेत, असं आव्हाड म्हणाले.
सुप्रिया सुळे यांचं ट्विट
औरंगाबादमध्ये सकाळी साडेसहापासून वीज नव्हती. मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या औरंगाबादची ही अवस्था; खेड्यापाड्यात तर असे अघोषित भारनियमन सुरूच आहे. @CMOMaharashtra तुम्ही महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार होता म्हणे. तुमच्या त्या घोषणेचे काय झाले?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.