औरंगाबाद : औरंगाबादच्या सिद्धार्थ बागेतील दोन हत्तीणींना विशाखापट्टणमच्या  इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्कला हलवण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र सरस्वती आणि लक्ष्मी या दोन हत्तीणींना सिद्धार्थ उद्यानाचा इतका लळा लागला आहे, की त्या जाण्याचं नाव घेत नाहीयेत.


यातील एका हत्तीणीला तर चक्क गुंगीचं इंजेक्शन देऊनही फायदा झाला नाही. शेवटी हत्तीच्या भावना यंत्रापुढे चालल्या नाहीत, त्यांना क्रेनच्या सहाय्याने गाडीत टाकण्यात आलं.

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील हत्तीघर आता सुनं सुनं झालं आहे. हौदातील पाणी सोंडेत घेऊन पाण्याचे फवारे उडवण्याची गंमत आता छोट्या दोस्तांना पाहता येणार नाही. जेवढा औरंगाबादेतल्या बच्चे कंपनीला हत्तीणींचा लळा आहे, तेवढाच हत्तीणींनाही औरंगाबादकरांचा लळा लागला.



यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून विशाखापट्टणम येथील पथक हत्तींना गाडीत टाकण्याचा प्रयत्न करत होतं. पण त्या काही गाडीत बसायला तयार नव्हत्या. त्यातील एका हत्तीणीला तर चक्क भुलीचं इंजेक्‍शन देण्यात आलं. मात्र तरीही काहीच फायदा झाला नाही.

दोन दिवस प्रयत्न करुनही पथकाला या हत्तीणींना गाडीत टाकता आलं नाही. शेवटी क्रेनच्या सहाय्याने हत्तीणींना गाडीत टाकण्यात आलं. मात्र या वेळेला गेली कित्येक वर्षे त्यांना सांभाळणार्‍या औरंगाबाद महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. या कर्मचाऱ्यांनी गेल्या कित्येक दिवस या हत्तीणींची सेवा केली होती. त्याच त्यांना सोडून जाणार असल्याने याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील सरस्वती आणि लक्ष्मी या हत्तीणी सर्वांसाठीच आकर्षणाचं केंद्र होत्या. प्राणी संग्रहालयात हत्तीघराच्या भिंतीभोवती उभे राहून हत्तीणींच्या लिला न्याहाळण्याऱ्या गर्दीच्या चेहऱ्यावर उत्साह, कुतूहल भरून गेलेलं असायचं. गेल्या दोन दशकांपासून आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या हत्तीणींना विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आलं.

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील हत्तींचा इतिहास

महापालिकेने सिद्धार्थ उद्यानाच्या परिसरात प्राणी संग्रहालय सुरू केल्यानंतर म्हैसूर येथून 1996 साली शंकर आणि सरस्वती ही हत्तीची जोडी आणली. शंकर आणि सरस्वतीपासून नोव्हेंबर 1997 मध्ये लक्ष्मीचा जन्म झाला.

शंकर, सरस्वती आणि लक्ष्मी हे प्राणी संग्रहालयाचं आकर्षण होते. प्राणी संग्रहालयात सुरुवातीची दोन - तीन वर्षे हत्तीवरची सफर सुरू होती. आजारपणामुळे 2000 मध्ये शंकरचं निधन झालं. तेव्हापासून सरस्वती आणि लक्ष्मी या दोन हत्तीणी प्राणी संग्रहालयात आहेत.

शंकरच्या मृत्यूनंतर हत्तीवरची सफर बंद करण्यात आली. त्यानंतर हत्तीघराच्या परिसरात माहुताच्या मदतीने हत्तींची कसरत दाखवली जात होती. हत्तीणींना प्राणी संग्रहालयात ठेवू नका, असे आदेश सेंट्रल झू अॅथॉरिटीने पाच वर्षांपूर्वी दिले. पण औरंगाबादेत मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. हत्ती या प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण आहेत, असे सांगून पालिकेच्या प्रशासनाने काही लोकप्रतिनिधींच्या मदतीने हत्तीणींना ठेवून घेतलं होतं.

औरंगाबाद प्राणी संग्रहालयामध्ये या हत्तीणी साखळदंडांनी बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे हाल होतात, असं म्हणत औरंगाबाद खंडपीठाने एक सुमोटो याचिका दाखल केली होती. त्यानंतर या हत्तीणीला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली.

अखेर आज या हत्तीणींना विशाखापट्टणम येथे हलवण्यात आलं. पण लळा काय असतो, हे गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादकरांनी पाहिला आहे. औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील या हत्तीणी आता दिसणार नाहीत, पण त्यांच्या आठवणी सिद्धार्थ उद्यानात येणाऱ्या प्रत्येक औरंगाबादकराच्या मनात कायम असतील.