बीड : वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेनंतर 12 तारखेचा गोपीनाथ गडावरील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार होते.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबरला परळी येथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या दुर्घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करत असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. आपण कुटुंबासह गोपीनाथ गडावर लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध असू, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पंकजा मुंडे या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत. या कारखान्यातील उकळत्या ऊसाच्या रसाची टाकी फुटून मोठी दुर्घटना घडली. यात पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट काय आहे?

''8 डिसेंबर 2017 रोजी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये जो अत्यंत भीषण अपघात झाला त्यामध्ये 12 लोक गंभीर जखमी झाले व त्यापैकी 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. व कारखान्याचे सर्व कर्मचारी, संचालक मानसिक धक्क्यामध्ये आहेत. मी या भागाची लोकप्रतिनिधी, पालक व कारखान्याची चेरमन म्हणून व्यथित आहे. वैद्यनाथ कारखाना हा लोकनेते मुंडे साहेबांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. व त्यांच्या पश्चात वैद्यनाथ सहकारी कारखाना हे त्यांच्या कष्टाचे  व स्वप्नाचे प्रतिक म्हणून आमच्यासाठी हा जिवाभावाचा विषय आहे. या कारखान्या मध्ये असा विचित्र अपघात घडल्यामुळे त्याची कारणमीमांसा करण्याची पडताळणी सुरू आहे. शोकाकुल परिवार हा कारखान्याशी अनेक वर्षे संबधीत असल्यामुळे तो आमचा हो परिवार आहे. त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांना नोकरी देणे याची शाश्वती देऊन त्यांना मदत नक्कीच झाली आहे, परंतु कुटुंबातील व्यक्ती गमावल्याचे दुःख त्यांच्या सोबत आम्हाला ही आहे. सबंध महाराष्ट्रातील लोकनेते मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक 12 डिसेंबर ला राज्यातील कानाकोपऱ्यातुन साहेबांच्या ओढीने गोपीनाथ गडावर येतात साहेबांच्या समाधीचे दर्शन करून इथल्या सामाजिक उत्थान दिनाच्या कार्यक्रमातून ऊर्जा, प्रेरणा व आशा घेऊन जातात. कारखान्यातील दुर्दैवि घटनेनंतर राज्यातील लोकांचा  साहेबांच्या दर्शनासाठी येणारा ओघ थांबवता येणार नाही.  पण दरवर्षी प्रमाणे त्यादिवशी आयोजित केलेले कार्यक्रम जे वंचित, महिला, ऊसतोड कामगार यांच्यासाठीच आहेत ते या परिस्थितीत रद्द करत आहोत. मी स्वतः माझ्या परिवारा समवेत 12 डिसेंबर ला गोपीनाथ गडावर सकाळी 11.00 वाजल्या पासून लोकांच्या भेटीसाठी उपस्थित राहील, जेणेकरून विविध ठिकाणाहून पायी दिंडी, संघर्ष ज्योत, रथ यात्रा घेऊन निघालेल्या लोकांची माझी भेट होऊ शकेल.

माझ्या कारखान्यातील जणू माझा परिवार असलेल्या शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणं त्यांच्या वेदनांशी समरूप होणं हीच मुंडे साहेबांची खरी शिकवण आहे, साहेबांच्या शिकवणी प्रमाणे वागून आयोजित कार्यक्रम रद्द करून जयंती च्या दिवशी मुंडे साहेबांचे स्मरण करणे साहेबांच्या विचाराशी समर्पक होईल. आपण समजून घ्याल हा विश्वास आहे.''

-पंकजा गोपीनाथ मुंडे

कार्यक्रम पत्रिका



संबंधित बातमी :

वैद्यनाथ कारखाना दुर्घटना, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी सहा लाखांची मदत