नागपूर : भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत पक्षाचं सदस्यत्वही सोडलं आहे. मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा होता, याची उपरती त्यांना लवकरच होईल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. शिवाय विविध मुद्द्यांवरुन पत्र लिहिणाऱ्या आमदार आशिष देशमुख यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.


हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला.

दरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख हे देखील नाना पटोले यांच्यानंतर बंड करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण त्यांनी विविध मुद्द्यांवर सात पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. पण हे पत्र मला मिळण्याअगोदरच माध्यमांना मिळालं, असं म्हणत आशिष देशमुख यांच्यावरच पलटवार केला आहे.

आशिष देशमुख बंडाच्या पवित्र्यात?

खासदार नाना पटोले यांच्यानंतर आता नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या पवित्र्यात आहेत. सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचं पत्र लिहिलं आहे, ज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी ही रास्त असल्याचं म्हटलं आहे.

फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा - सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राइम कॅपिटल बनलं, असं आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

आशिष देशमुख यांनी पत्रात काय म्हटलंय?

आशिष देशमुख यांनी 6 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

नागपूर मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पामुळे जनतेचा फायदाच होणार आहे. या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत. मात्र या कामासाठी लागणारा पैसा लहान उद्योगांना सबसिडी म्हणून दिला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती, असं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

नाना पटोलेंचा खासदारकीचा राजीनामा

भाजप खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी भाजप सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला..

‘राजकारणात कुणी कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचं नसतं. पण मुख्यमंत्र्यांची सध्याची जी सवय आहे की ते जवळच्याच व्यक्तीच्याच वैयक्तिक जीवनात जातात. तसं त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. एवढीच माझी त्यांना सूचना आहे.’ असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या :

स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त, आशिष देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना : नाना पटोले