परभणी : टिकटॉक अॅपचं वेड तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहे, याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. मात्र परभणीतील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दाम्पत्याने शाळेतील विद्यार्थ्यांनाच टिकटॉकचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. टिकटॉक व्हिडीओ तयार केले नाही तर हे शिक्षक विद्यार्थ्यांना चक्क वर्गाबाहेर उभं करत होते. मात्र शिक्षक दाम्पत्याच्या या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी याबाबत पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आणि पालकांनी या शिक्षकांवर कारवाई व्हावी यासाठी शाळेलाच कुलूप ठोकलं आहे.
गोदाकाठेवर वसलेल्या धारखेड गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिले ते आठवीचे वर्ग आहेत. याच गावातील एकूण 160 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. शाळेतील शेख इमाम व शेख नजमा हे पती-पत्नी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी वेगवेगळे व्हिडीओ दाखवणे, टिकटॉकचे व्हिडीओ जास्त प्रमाणात दाखवून त्यांच्याकडून त्याच प्रमाणे व्हिडीओ बनवून घेत होते. जर विद्यार्थ्यांनी व्हिडीओ बनवण्यास विरोध केला किंवा नकार दिल्यास विद्यार्थ्यांना दोन-दोन तास वर्गाबाहेर उभे करत होते.
शिवाय दुसऱ्या शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात व्द्वेष निर्माण करण्याचं काम या शिक्षक दाम्पत्याकडून सुरु होतं. महत्वाचे म्हणजे कुणी तक्रार केल्यास आपले नातेवाईक पोलीस उपनिरिक्षक असल्याचं सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांना देत असत. शिक्षकांच्या या वागणुकीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करुन ही शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात न आल्याने गावकरी आणि पालकांनी एकत्र येऊन शाळेला टाळं ठोकलं आहे. जोपर्यंत या संबंधित शिक्षकांवर कारवाई होणार नाही. तोपर्यंत टाळं उघडणार नसल्याचा पवित्रा या पालक आणि गावकऱ्यांनी घेतला आहे.
या टिकटॉक प्रकरणाची शिक्षण विभागानंही दखल घेतली असून, चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलं आहे. शिक्षण विभाग या टिकटॉकच्या प्रेमात पडलेल्या शिक्षकांवर कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे.