शिर्डी : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले शहर ज्ञानोबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून गेलं होतं. अकोले तालुक्यातील सर्वच गावांनी कडकडीत बंद ठेवत प्रतिसाद दिला आहे. तर इंदोरी गावातून निघालेल्या मोटार सायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तालुक्यातील 85 हून अधिक गावांनी ग्रामसभेत केलेले ठराव यावेळी प्रशासनाला देण्यात आले.


निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्या नंतर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्यांना नोटीस ही बजावण्यात आली. मात्र निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत नोटीसीला उत्तरही देण्यात आलं. मात्र याच दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अकोलेत येऊन इंदोरीकरांना काळे फासण्याचा इशारा दिल्यानंतर अकोले तालुक्यातील ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी अकोले बंदचा इशारा दिला.


आज सकाळपासून अकोले तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला तर सकाळी 9 वाजता इंदोरीकरांच्या इंदोरी या मूळ गावातून बाईक रॅली काढत युवकांनी आपला पाठिंबा दर्शवला. इंदोरी, सुगाव, कळसमार्गे काढण्यात आलेल्या रॅलीची सांगता शहरातील महात्मा फुले चौकात करण्यात आली व यानंतर निषेध मोर्चाला सुरवात झाली.


महात्मा फुले चौकातून निघालेला मोर्चा हा एखाद्या दिंडी प्रमाणेच दिसत होता. वारकरी संप्रदायासह सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकारामच्या गजरात हाती टाळ मृदुंग घेत अबाल-वृद्ध यात सहभागी झाले होते. यानंतर बाजार तळावर मोर्चाचं रुपांतर सभेत झालं. यावेळी भाजप नेते मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे, अशोक भांगरे, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येन उपस्थित होता. अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या तृप्ती देसाई विराधात कारवाई करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.


संबंधित बातम्या :