औरंगाबाद : आज शिक्षक दिन. एक शिक्षक एक पिढी घडवतो. असाच एक प्रयोगशील शिक्षक औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बडकवस्तीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाला. आणि 10 ते 12 वर्षांच्या चिमुकल्यांनी भाज्या धुण्याचं घरगुती मशीन बनवत गावकऱ्यांची भीती दूर तर केलीच शिवाय त्यांच्या प्रयोगाला देशात पहिलं पारितोषिकही मिळालं.
कोरोना गाव -खेड्यात पोचला आणि त्याबरोबर भीतीही. कोरोनाच्या भीतीने गावातील लोकांच्या मनातही भाजी खरेदीची भीती निर्माण झाली. मग औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बडकवस्ती शाळेचे प्रयोगशील शिक्षक विशाल टीप्रमवार या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने घरगुती साहित्याने भाज्या धुण्याचं मशीन तयार केलं.
या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरात सहज सापडणार्या वस्तू पासूनच हा प्रयोग पूर्ण केला. एक पाण्याची कॅन, लोखंडी रॉड, बॉटल साफ करण्याचे ब्रश असे अगदिच किरकोळ साहित्य विद्यार्थ्यांनी वापरले. आणि हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी परिसरातूनच गोळा केले. झाकण तयार करणे आणि पाण्याची तोटी एवढाच एकशे वीस रुपयांमध्ये प्रकल्प झाला. पुढे हा प्रयोग डिजाईन फॉर चेंज इंडिया NGO यांनी युनिसेफ, अटल इनोवेशन मिशन आणि निती आयोग आयोजित केलेल्या स्पर्धेत पाठवला आणि देशात पहिला आला. डिजाईन फॉर चेंज इंडिया NGO यांनी युनिसेफ, अटल इंनोवेशन मिशन व निती आयोग यांचे द्वारा संचालक नंदिनी सूद यांनी आयोजित केला.
डीएफसी युनिसेफबद्दल माहिती कशी मिळाली?
सोशल मीडियावर तसेच शिक्षकांच्या ट्रेनिंग समूहावर युवा चॅलेंज स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी करण्यासंबंधीचे आवाहन करण्यात आले होते. अर्थातच ही नोंदणी कायम विनाशुल्क असते. लिंक आम्हाला योगायोगाने भेटली आणि आम्ही नोंदणी करून दहा ऑगस्ट पर्यंत आमचा प्रोजेक्ट सादर केला, असं विशाल टीप्रमवार यांनी सांगितलं.
नेमका हाच उपक्रम करावा हे कसे सुचले
कोरोना संबंधित समस्या असा विषय यावेळी ठेवण्यात आला होता. मुलांना या संबंधित चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात मुलांनी अनुभवलेल्या समस्या यावर मुलं बोलती झाली. बरेच मुलांनी शाळा बंद आहे त्यामुळे अभ्यासाची समस्या. कोरोनामुळे बाहेर कुठे निघता येत नसल्याची समस्या. आमच्या घरी पाहुण्यांचे येणे जाणे बंद झाले असल्याची समस्या आदी समस्या पुढे आल्या.
रोग प्रतिकार शक्ती वाढवणे किती गरजेचे आहे हे शिक्षकांनी मुलांना समजून सांगितल्यानंतर अचानकपणे मुलांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी चे उपाय विचारले. त्यात फळे आणि भाजीपाल्याचा दैनंदिन आहारात समावेश असावा असे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी लगेच सांगितले की त्यांच्या घरी सध्या कुठल्याही प्रकारे भाजीपाला आणि फळे आणणे जवळपास बंदच केले आहे. कारण त्यांचे पालक बाजारात जाऊन भाजीपाला घ्यायला घाबरतात. कित्येक लोक फळांना आणि भाजीपाल्याला स्पर्श करतात. पालकांना यासंबंधी विचारणा केली असता ही समस्या खरी असल्याचे त्यांनी कबूल केले आणि खूप प्रमाणात भाजीपाला आणि फळे आणण्याचे कमी केल्याचेही सांगितले .अशाप्रकारे आम्हाला आमची समस्या सापडली आणि पालकांची मनोवृत्ती बदलण्यासाठी, त्यांचे काम कमी करण्यासाठी, आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह शोधण्यासाठी त्यावर काम करायचे विद्यार्थी व आम्ही ठरवले, असं त्यांनी सांगितलं.
या प्रोजेक्टमध्ये सौरभ राकडे, चेतन खिल्लारे, साईराज कुदळे, अनुजा तांदळे, आशिष सोनवणे, दिपक बडक, रूपाली रमेश सोनवाणे, आदित्य बडक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरात सहज सापडणार्या वस्तू पासूनच हा प्रोजेक्ट पूर्ण केला. पाण्याचा कॅन, लोखंडी रॉड, बॉटल साफ करण्याचे ब्रश असे अगदीच किरकोळ साहित्य विद्यार्थ्यांनी वापरले. आणि हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी परिसरातूनच गोळा केले. जसे पाण्याची वापरात नसलेली कॅन सौरभने आणली होती. स्टॅन्ड बनवण्यासाठी शाळेतच तुटलेली लाकडाची खुर्ची त्यांनी वापरली. झाकण तयार करणे व पाण्याची तोटी एवढाच एकशे वीस रुपयांमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. एक प्रयोगशील शिक्षक काय करू शकतो ,त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मग ती एखादी कॉन्व्हेंट स्कूल असू देत किंवा वस्तीवरची जिल्हा परिषदेची शाळा. अशा या प्रयोगशील शिक्षकांना आज शिक्षक दिनी एबीपी माझ्याकडून सुद्धा अनेक शुभेच्छा..
औरंगाबादच्या बडकवस्ती झेडपी शाळेच्या पोरांची कमाल, कोरोनाचा 'हा' प्रयोग देशात पहिला
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
05 Sep 2020 10:54 AM (IST)
एक प्रयोगशील शिक्षक औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बडकवस्तीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाला.
शिक्षकाच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी भाज्या धुण्याचं घरगुती मशीन बनवत गावकऱ्यांची भीती दूर तर केलीच शिवाय त्यांच्या प्रयोगाला देशात पहिलं पारितोषिकही मिळालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -