अमरावती :  विद्येचं दान देणाऱ्या शाळेतच एका नराधम शिक्षकाकडून तब्बल तीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका शाळेत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय नागे याला अटक केली आहे. जिल्ह्यात अवैध धंदे, मुलींवर होणारे अत्याचार असे प्रकार उघड व्हावे यासाठी जानेवारी महिन्यात पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्थानक आणि इतर महत्वाच्या ठिकाणी 300 तक्रार पेट्या लावल्या आहे.


अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका शाळेत नराधम शिक्षक संजय नागे हा कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तीन पीडित विद्यार्थीनी सोबत अश्लील गैरवर्तन करत होता. तसेच विद्यार्थीनींनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला असता तो त्यांना मारहाणही करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान शिक्षकाच्या या गैरवर्तणुकीला कंटाळलेल्या या विद्यार्थीनींनी या शिक्षकाच्या सुरू असलेल्या कारनाम्याची तक्रार लिहून शाळेतील तक्रार पेटीत टाकून दिली.


प्रेमविवाह न करण्याची शपथ प्रकरणी तीन प्राध्यापक निलंबित


त्यानंतर आता जिल्ह्याभरातील तक्रार पेट्या दुसऱ्यांदा उघडल्या. या नंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार या तक्रारींमधून समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ हरिबालाजी एन यांनी महिला पोलिसांचे एक विशेष पथक तयार करून संबंधित शाळेच्या तपासणीसाठी पाठवले. यावेळी तक्रारीतील तथ्य समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय नागेला अटक केली आहे.

दरम्यान हे प्रकरण सरकारने गांभीर्यानं घेतलं आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे. दोषी शिक्षकावर कारवाई कडक कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

धामणगाव रेल्वेतील तरुणीच्या हत्याप्रकरणाला वेगळं वळण; आईवडिलांच्या आरोपांमुळे खळबळ


राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींना देखील नराधम आपली शिकार बनवत आहेत. यात पवित्र समजलं जाणारं गुरु शिष्याचं नात देखील बदनाम होत चाललं आहे. विद्यादानाचं काम करणाऱ्या शिक्षकांकडून आपल्या विद्यार्थिनींना वासनेचं शिकार बनवत असल्याचा घटना समोर येत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. नुकतंच नवी मुंबईतील महापालिका शाळेतील एका शिक्षकानं विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता अमरावतीतील या घटनेनं पुन्हा संतापाची लाट परसली आहे.