अमरावती : धामणगाव रेल्वे शहरात तरुणीच्या हत्याप्रकरणाला वेगळं वळण लागलंय. सहा जानेवारीला एका माथेफिरूने चाकूचे अनेक वार करून तरुणीची हत्या केली होती. त्यानंतर आरोपी सागर तितुरमारे याने स्वतःलाही चाकूने भोसकून घेतलं होतं. आता एका महिन्यानंतर या प्रकरणातील दुसरा अजून एक किळसवाणा आणि भितीदायक पदरही उलगडला गेलाय. ज्या ठाणेदाराकडे आई-वडील आणि मुलगी माथेफिरूची तक्रार घेऊन गेले होते. त्या ठाणेदारांनी तिला सुरक्षा देण्याऐवजी वारंवार फोन करून, अश्लील बोलून, इतकचं नाही तर वारंवार कॉलेजमध्येही भेटायला जात होता. तिला पार सळो की पळो करून सोडलं अन् शेवटी तिचा जीव गेला.


अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे सहा जानेवारीला अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी थेट ठाणेदारा विरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळे विद्यार्थिनीची हत्या नेमकी कशासाठी झाली? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. धामणगाव रेल्वे येथे महिनाभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे सागर तितुरमारे याने चाकूने वार करून हत्या केली. या प्रकरणाचा तपास धामणगाव रेल्वे येथील दत्तापुर पोलीस करत आहेत. पण हत्येपूर्वी या प्रकरणात आई-वडिलांनी दोन वेळा सागर तितुरमारे मुलीला त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याच्याविरुद्ध हत्येपूर्वी दत्तापुर पोलिसांकडून कठोर कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी केला आहे.

जुलै 2019 आरोपीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याची तक्रार -

जुलै 2019 मध्ये माझ्या मुलीला फूस लावून हत्या करणारा सागर तितुरमारे याने पळवून नेल्याची तक्रार दत्तापुर पोलिसात केली होती. त्यावेळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र सोनोने यांनी मुलीचा शोध लावून चार दिवसांनी परत आणले होते. त्यानंतर आम्ही दोघे आणि मुलीला नंतरची तक्रार देण्यासाठी ठाण्यात बोलावले होते. पण आमची तक्रार घेऊन माझ्या मुलीचे मेडीकल करा आणि त्या सागर याच्यावर गुन्हा दाखल करा, असे आम्ही दोघांनीही विनंती केली. मात्र, ठाणेदारांनी आम्हाला तसे करू नका तुमच्या मुलीची बदनामी होईल असे सांगितले. तरी पण आम्ही ठाणेदाराला विनंती केली तर त्यांनी माझ्या मुलीला त्यांच्या ऑफिसमध्ये एकटीला घेऊन अडीच तास चर्चा केली आणि आम्ही आई-वडील दोघेही रात्री साडेदहापर्यंत बाहेर थांबून होतो. तरीही त्यांनी गुन्हा दाखल केलाच नाही. उलट आम्हाला सांगितले, की तुम्ही चिंता करू नका, काही होणार नाही, घरी जा मी सांभाळून घेतो.

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणेदाराकडून मुलीला वारंवार त्रास -

यानंतर आम्ही काही दिवसांनी आमच्या मुलीला कॉलेजमध्ये पाठवणे सुरू केले. तेव्हा ठाणेदार हे स्वतः आमच्या घरी येऊन तुमची मुलगी सुंदर आहे, मी तिला पोलिसात लावून देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांचे घरी या ना त्या कारणावरून जबरदस्ती येणे सुरू झाले. इतकच नाही तर ठाणेदार हे मुलीला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये जात होते. वारंवार तिला फोन करत होते. शेवटी मुलीने ही बाब तिच्या आईला सांगितले, की आई ठाणेदार खूप वाईट बोलतो फोनवर त्यांना सांग की फोन नका करत जाऊ, तरी ठाणेदार यांनी थातूर-मातूर उत्तर देऊन फोन लावणे सुरूच ठेवले. सहा जानेवारीला सागर तितुरमारे याने मुलीची निर्घृण हत्या केली, असे गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात एबीपी माझाने ठाणेदार रवींद्र सोनोने यांच्याशी ठाण्यात जाऊन भेट घेण्यासाठी आणि त्यांची बाजू ऐकण्यासाठी गेले असता ते सरकारी बंगल्यात होते, त्यांना कॉल केला असता पोलीस ठाण्यातील दोन शिपाई काही कामानिमित्त त्यांच्या घराची बेल वाजवली पण त्यांनी काही दार उघडलं नाही. मुलीच्या आईवडिलांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मुलीच्या हत्येचा तपास आता मोर्शी येथील एसडीपीओ कविता फरतडे यांच्याकडे सोपवला आहे. पण सत्य समोर येणार का? हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.