Vegan Food Misal: मिसळ(Misal) पुण्याची की कोल्हापुरची हा वाद अगदीच प्रसिध्द आहे. मग त्यात नाशिक, मुंबई, खान्देशी अशा इतरही काही ठिकाणांचा समावेश आहे. पण मिसळ कुठलीही असो तिचा आनंद खवय्ये अगदी पुरेपुर आणि मनो घेत असतात. महाराष्ट्रात मिसळ हा लोकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत मिसळचा समावेश असतो. अगदी खास बेत म्हणून देखील मिसळीचा बेत केला जातो. 


हीच मिसळ आता महाराष्ट्राचीच नाही तर जगासाठी विशेष ठरण्याची शक्यता आहे. जगातील 50 पारंपारिक विगन(Vegan) पदार्थांची यादी टेस्ट ऍटलास कडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात मिसळ ही 11 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आता मिसळ विगन पदार्थ म्हणून सुध्दा आवडीने खाता येईल. मिसळ आणि खवय्ये प्रेमींचे एक वेगळे नाते आहे. त्यात मिसळ आता विगन पदार्थांच्या यादीत सामील झाल्यामुळे तिचं महत्त्व जागतिक पातळीवर देखील वाढेल यात शंका नाही.. 


काय आहे हे 'टेस्ट ऍटलास'?


जगातील विगन पदार्थांची यादी ही टेस्ट ऍटलासकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. पण हे नक्की काय आहे? तर हे जगातील पारंपारिक पदार्थांचे विश्वकोष आहे. जगातील कोणत्याही देशातील पारंपारिक पदार्थ त्यांत वापरले जाणारे पारंपारिक साहित्य या सगळ्याची माहिती टेस्ट ऍटलासच्या वेबसाईटवर मिळते. तसेच तुम्हाला एखाद्या देशाचे पारंपारिक पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट हवे असेल तर त्याची माहितीदेखील टेस्ट ऍटलासवर तुम्हांला उपलब्ध होते. 


 


विगन यादीत मिसळचा समावेश कसा?


विगन पदार्थ म्हणजे दुधापासून किंवा प्राण्यांपासून तयार न झालेले पदार्थ. मग यात आता मिसळ कशी?  तर अगदीच सोपं आहे. मिसळमध्ये बटाट्याची भाजी, कडधान्यांचा रस्सा, त्यावर फरसाण, कांदा आणि लिंबू अशी सर्वसाधारण मिसळ तयार केली जाते. पण यातले कोणतेही पदार्थ हे दूधापासून तयार होत नाहीत. मिसळ हा तर शाकाहारी पदार्थ त्यामुळे याचा प्राण्यांशी किंवा मांसाहाराशी संबंधच येत नाही. राहीला प्रश्न पावाचा किंवा ब्रेडचा जो मिसळ सोबत खाल्ला जातो. पाव किंवा ब्रेड हे मैद्यापासून तयार केले जातात आणि त्यात इस्टचा वापर केला जातो. त्यामुळे इथेही दुधाचा कोणताही समावेश होत नाही.  या सर्व गोष्टींमुळे मिसळ ही जगाच्या 50 पारंपारिक विगन पदार्थांच्या यादीत जाऊन बसली आहे. 


मिसळसहित आणखी काही भारतीय पदार्थ... 


या यादीत फक्त मिसळ नसून इतरही काही पारंपारिक भारतीय पदार्थ आहेत. आलू गोबी, गोबी मंच्युरिअन, मसाला वडा, भेळपुरी, राजमा चावल या पदार्थांचा समावेश आहे. यामध्ये आलू गोबी 20 व्या स्थानावर, गोबी मंच्युरिअन 24 व्या स्थानावर, मसाला वडा 27 व्या स्थानावर, भेळपुरी 37 व्या स्थानावर तर  राजमा चावल 41 स्थानावर आहे. 


त्यामुळे आता तुम्ही विगन जरी असाल तरी हे पदार्थ तुम्ही अगदी बिंधास्तपणे खाऊ शकता. सोबतच त्याचा मनमुराद आनंददेखील घेऊ शकता.