Market Committee Election: राज्यात सर्वत्र बाजार समितीच्या निवडणुका सुरु आहेत. कुठे तिरंगी तर कुठे दुरंगी लढती होताहेत. मागच्या 25 वर्षांपासून परभणीच्या (Parbhani) पाथरी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची सत्ता आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांचासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तगडे आव्हान उभे केले आहे. ज्या पाथरी बाजार समितीत बाबाजानी यांच्याविरोधात पॅनल उभा करण्यासाठी उमेदवार मिळायचे नाही, तिथे संपूर्ण 18 जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे करत, त्यांच्या पाठीशी आपली ताकत उभी केल्याने याच निवडणुकीची चर्चा जिल्ह्यात होत आहे.  


परभणीच्या पाथरी येथील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषदेच्या जागा, पंचायत समिती, बाजार समिती या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या ताब्यात मागच्या अनेक वर्षापासुन आहेत. इथे अनेकवेळा विविध निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. परंतु, बाबाजानी दुर्रानी यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी सईद उर्फ गब्बर खान यांनी गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकत पाथरीत उभी केली. अनेक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक आदींना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रवेश दिला. त्यातच पाथरी बाजार समितीची निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रूपाने तगडे पॅनल उभे राहिले आहे. 


यावेळी कोण बाजी मारणार?


बाजार समितीची निवडणूक ही पूर्णतः आर्थिक गणितावरच अवलंबून असते. ज्यांची आर्थिक गणित सक्षम त्यांच्या पारड्यात सत्ता जाते हे अनेक वेळा झालेल्या निवडणुकांमधून समोर आले आहे. मागच्या अनेक वर्षात पाथरीत दुर्रानी यांच्या गटासमोर तेवढे आव्हान नसल्याने त्यांना निवडणूक सोपी जायची. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांनी राष्ट्रवादीच्या बरोबरीने सर्वच बाबतीत गणित जुळवले आहेत. त्यातच सर्वच जागांवर उमेदवार हे तोडीस तोड दिल्याने ह्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. त्यामुळे मागच्या 25 वर्षांपासून सत्तेवर असलेली राष्ट्रवादी यंदाही सत्ता राखणार की, एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्ता खेचणार हे येत्या 30 एप्रिल रोजीच स्पष्ट होईल.


बाजार समितीचे गाळे नियमबाह्य पद्धतीने व्यापाऱ्यांना विकल्याचा आरोप 


बाजार समीतीची निवडणूक लागल्यांनंतर पाथरीत 18 एप्रिल रोजी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सईद खान, भाजपचे नेते उद्धव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या संचालक मंडळाने सत्तेत असताना बाजार समितीत 32 गाळे हे नियमबाह्य पद्धतीने व्यापाऱ्यांना विकले गेल्याचा आरोप केला. ज्यातून राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह बाजार समितीच्या संचालक मंडळाने उखळ पांढरे करून घेतल्याचाही आरोप केला होता. तर याबाबत त्यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली आणि जिल्हा लेखा परीक्षक परभणी यांनी चौकशी करून जो अहवाल दिला तो अहवालच पत्रकार परिषदेत सादर करत कारवाईची मागणी केली होती. यावर मात्र राष्ट्रवादीच्या संचालक मंडळ अथवा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी काहीही प्रतिकिया दिली नव्हती. त्यामुळे आता बाजार समितीच्या निवडणुकीत कोण  बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Drone Farming : ड्रोनने पिकनिहाय फवारणीची कार्यपद्धत निश्चित; कृषीमंत्र्यांच्या हस्ते मसुद्याचे प्रकाशन