तासगाव बसस्थानकातुन शेवटीची बस निघून गेल्याने 23 मुली बसस्थानकातच अडकून पडल्या. तासगाव तालुक्यातील शिरगाव, बोरगाव आणि निंबळकर या गावच्या 23 मुली घरी कसं जायच या विचारान भेदरल्या होत्या. ही बाब पोलीसांच्या लक्षात आली आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी कैद्यांना नेणारी मोठी गाडी तासगाव बस स्थानकात आणत मुलींना गाडीत बसा घरी सोडतो असे सांगितले. घरी जायला काही नसल्याने पोरी दबकत दबकत गाडीत बसल्या व पोलिसांनी अगदी व्यवस्थित त्यांना घरापर्यंत पोहचवलं. अजून सहा दिवस या मुलींचे पेपर असल्याने पोलिस दररोज त्यांना घरी सोडणार असल्याचे गोपनीय विभागाचे मोहन वंडे यांनी सांगितले. पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी तोंडभरुन कौतुक केले.
'त्या' घटनेनंतर अनेक ठिकाणी पोलीसांकडून मुलींना विशेष मदत
हैदराबाद येथे महिला पशु वैद्यकीय डॉक्टरचा बलात्कार आणि नंतर हत्या करुन जाळून टाकल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. सोबतच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पोलीसांनी मुलींना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी मदत केंद्र, पथकाची स्थापना केली आहे. बीड पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी 'कवच' या नावाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. यात मदतीसाठीचे फोन नंबर दिले आहेत. या अभियानांतर्गत रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेला किंवा मुलीला असुरक्षित वाटल्यास पोलीसांना संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एबीपी माझाने या उपक्रमाची रिअॅलीटी चेक केली असता यात बीड पोलिस पास झाले आहेत.
निर्भया पथक, सारथी -
नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीही महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात निर्भया पथकाची स्थापना केली आहे. याअंतर्गत कोणत्याही ठिकाणी मुलगी अथावा महिलांना फोन केल्यानंतर काही वेळातच मदत दिली जाणार आहे. तर, रात्रीच्या वेळी अडचणीत सापडलेल्या मुली, महिलांच्या मदतीसाठी 'सारथी' नावाचा नवीन उपक्रम पोलीस प्रशासनाने सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत संकटात असलेल्या महिलांना पोलिसांचे 'सारथी' वाहन तातडीने घटनास्थळी जाऊन मदत करणार आहे. रात्री घरी जाण्यास उशीर झाल्यास संबंधित मुलीला तिच्या घरी नेऊन सोडण्याचेही काम करणार आहे.
हेही वाचा - महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी बीड पोलिसांचं कवच, 'माझा'च्या रिअॅलिटी चेकमध्ये पोलिस पास
Special Report | 'ऑपरेशन कवच', महिलांच्या सुरक्षिततेसाठी बीड पोलिसांची तत्पर हेल्पलाईन | ABP MAJHA