पालघर: तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अक्करपट्टी या गावातील प्रकल्पग्रस्त अपंग असलेल्या बापाला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी धडपड करावी लागत आहे. रेल्वे अपघातात अपंग झालेल्या  एका प्रकल्पग्रस्तांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने तारापूर येथील शाळेत शिकत असलेल्या आपल्या मुलीचे शाळेत शुल्क भरता आले नाही. यातच 10 वीची बुधवारपासून परीक्षा सुरू होत असताना देखील शाळेने परीक्षा प्रवेशपत्र देण्यासाठी नकार दिला आहे. यामुळे या सर्वांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असून यामुळे तिच्या शैक्षणिक अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


पालघर तालुक्यातील अक्करपट्टी या प्रकल्पग्रस्त गावातील संजय काशिनाथ कोरे यांचा काही वर्षापूर्वी रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात त्यांना 81 टक्के अपंगत्व आले होते. यातच घरची आर्थिक परिस्थिती देखील बिकट असल्याने मुलीच्या शिक्षणाचा खर्च त्यांना पेलवता आला नाही. त्यांची मुलगी पुर्णिता संजय कोरे ही 10 मध्ये असून तारापुर येथील न्युक्लियर फ्रेंड इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिक्षण घेत आहे. 10 वीची बोर्ड परीक्षा बुधवार 16 मार्च पासून सुरू होत आहे. मात्र शैक्षणिक शुल्क भरलेले नसल्याचे कारण पुढे करत शाळा व्यवस्थापनाने परीक्षेचे प्रवेशपत्र नाकारले आहे. यामुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या या विद्यार्थीनीला परीक्षेच्या अभ्यासाबरोबर आपल्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही याची चिंता आहे. शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने एखाद्या अपंग बापाच्या मुलीला शिक्षणेचे बाजारीकरण केलेल्या संस्था अशा प्रकारे वेठीस धरत असल्याने याबाबत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


शालेय जीवनात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या 10 वीच्या परीक्षेला आपल्या मुलीला बसता यावे यासाठी मुलीचे अपंग वडील संजय कोरे यांनी शाळेकडे अनेकदा विनवण्या केल्या आहेत. मात्र शाळेच्या व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुलीच्या पालकाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे पुर्णिता कोरे या विद्यार्थीनीला परीक्षेला बसू न द्यावे आणि त्यांना फी माफी द्यावी याबाबत पत्र तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सामाजिक बांधिलकी विभागाकडून देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत शाळा व्यवस्थापनाने शुल्क भरल्याशिवाय परीक्षेचे प्रवेश पत्र देणार नसल्याची भूमिका घेतली असल्याचे संजय कोरे यांनी सांगितले. संजय कोरे यांनी शाळेच्या मुजोर कारभाराविरोधात पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने तक्रार दिली असून मुलीला परीक्षा प्रवेश पत्र मिळावे यासाठी विनंती केली आहे. असे असले तरी उद्यापासून सुरू होणाऱ्या 10 वीच्या परीक्षेला प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


न्युक्लियर फ्रेंड इंग्लिश मीडियम स्कुलच्या उभारणीसाठी तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाकडून एक कोटी 50 लाखाचा फंड दिला होता. जेणेकरून प्रकल्पग्रस्त आणि आजूबाजूला असलेल्या गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता येईल. मात्र अशा घटनेमुळे अणुऊर्जा प्रकल्पाचा उद्देश सफल झाला नसल्याचे दिसून येत आहे. 


या मुलीचे वडील संजय कोरे म्हणाले की, "शाळेतील शिक्षकांनी शालेय शुल्क भरले नाही तर परीक्षेला बसू दिले जाणार नाही असे माझ्या मुलीला देखील सतत सांगत त्रास दिला होता. यातच मलादेखील शाळेकडून परीक्षा प्रवेश पत्र दिले जाणार नाही याबाबत सांगितले होते. शाळेय व्यवस्थापकांनी याबाबत योग्य निर्णय घेवून माझ्या मुलीच्या भवितव्याचा विचार करावा."


मात्र एबीपी माझाच्या माध्यमातून स्कुलचे सचिव संज्योत राऊत आणि विद्यार्थिनीचे पालक संजय कोरे यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतले असता दोन दिवस फेर्‍या मारूनही परीक्षा प्रवेश पत्र दिले जात नसल्याची तक्रार विद्यार्थिनीचे पालक संजय कोरे यांनी केली आहे.


आज परीक्षा प्रवेश पत्र मिळालं नसेल तर आम्ही उद्या परीक्षेच्या दिवशी देऊ असं आश्वासन शाळेचे पदाधिकारी केशरीनाथ सावे यांनी सांगितले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha