पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआय पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये बारामतीच्या शुभम शिंदेने बाजी मारली असून त्याचे यश हे विशेष आहे. मोलमजुरी आणि गॅरेज काम करुण उदरनिर्वाह करणाऱ्याच्या मुलाने पीएसआय पदाला गवसणी घातल्याने शुभमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

Continues below advertisement


शुभम शिंदे हा बारामतीमधील आमराई या भागात राहणारा. त्याचे वडील मिलिंद शिंदे हे मोलमजुरी आणि गॅरेज काम करतात. त्याची आई गृहिणी तर त्याला सहा बहिणी, आत्या तसेच आजी आणि आजोबा असा मोठा परिवार. शुभमच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या त्याच्या काकांचा कोरोनाकाळात मृत्यू झाला. त्यामुळे सर्व कुटुंबाची जबाबदारी शुभमवर येऊन पडली. अशाही खडतर परिस्थितीतून आपली चिकाटी न सोडता शुभमने एमपीएसचीचा अभ्यास केला आणि पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाला. शुभम शिंदेने अनुसूचीत जाती प्रवर्गात राज्यात 12 वा क्रमांक मिळवला. शुभमच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबियांनी मोठा आनंद साजरा केला.


शुभम शिंदेने दहावीचे शिक्षण शाहू हायस्कूल, बारामती येथून घेतलं. त्यानेतर बारावी आणि पदवीचे शिक्षण बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात घेतलं. शुभमने अर्थशास्त्र या विषयातून आपली पदवी पूर्ण केली. पदवी घेतल्यानंतर पीएसआय व्हायचं या एकाच ध्येयाने त्याने अभ्यास सुरू केला. 2016 साली त्याने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली. परंतु शारीरिक चाचणीत कमी गुण मिळाल्याने त्याचे नाव यादीत येऊ शकले नाही. 2017-18 सालीही त्याला अपयश आलं. 


सन 2018 साली त्याने कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर येथे प्रवेश घेतला आणि जोमाने अभ्यास सुरू केला. त्यानंतर 2019 साली त्याने परीक्षा दिली आणि सर्व टप्प्यातून उत्तीर्ण झाला. विशेष म्हणजे शुभमने हे यश कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय मिळवलय. आपल्या या यशामध्ये आई-वडील, काका अशोक शिंदे, आत्येभाऊ,  मित्रांची अनमोल साथ मिळाल्याचं शुभमने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


परिस्थिती कोणतीही असो, पण चिकाटी न सोडता प्रयत्न केले तर यश हे मिळतेच हेच शुभमच्या उदाहरणावरुन दिसून येतंय. शुभमचे यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 


संबंधित बातम्या :