Tanaji Sawant - Kaustubh Diwegaonkar News : मंत्री आणि अधिकाऱ्यांमधील समन्वयाने जनतेची कामं व्यवस्थित होत असतात. इकडे उस्मानाबादमध्ये मात्र आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Tanaji Sawant)आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Diwegaonkar) यांच्यातील कलह चव्हाट्यावर आला आहे. आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी राज्याचे सचिवाकडे जिल्हाधिकारी दिवेगावकरांची लेखी तक्रार करीत त्यांना समज देण्याची मागणी केली आहे.
सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी त्यांना जिल्हाधिकारी दिवेगावकर यांणी फोनवर दमदाटी करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचं पत्र सावंतांना लिहिलं होतं. त्या प्रकरणी खुद्द आरोग्यमंत्री सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
सदरील बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शासनाची प्रतिमा मलिन करणारी आहे आणि मंत्री आस्थापनेच्या कामात अडथळा निर्माण करणारी आहे असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सावंत यांनी मागितलेली प्रशासकीय माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली नाही, असं ओएसडी रेड्डी यांचं म्हणणं आहे.
जिल्ह्यातील माहिती गोळा करण्यावरुन वादाला किनार
सोमनाथ रेड्डी हे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सावंत यांच्या सांगण्यावरुन जिल्ह्यातील सद्यस्थितीमध्ये असलेल्या कामांची माहिती प्रगती अहवाल रेड्डी हे संबंधित अधिकाऱ्यांकडून करत आहेत. मात्र, ही माहिती तुम्ही कोणत्या अधिकारात संकलित करीत आहात अशी विचारणा दिवेगावकर यांनी केली. तर रेड्डी यांनी हे काम मंत्री सावंत यांच्या निर्देशानुसार करीत असल्याचे सांगितले. यावर अर्वाच्छ शब्दात दाब दिला आणि माहिती गोळा करू नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटल्याचं रेड्डी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिवाय अशी माहिती संकलित केल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहाल, तसेच माझ्या शासकीय कामात ढवळाढवळ केल्याचा गुन्हा नोंद करतील असा दम रेड्डी यांना दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
काय म्हणाले जिल्हाधिकारी?
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, विषय माहितीचा नाही. कोणीही नागरिक माहिती मागू शकतो. ज्याची पोस्टिंग नाही, त्यांना दुसऱ्या कार्यालयात काम करता येते का? आणि समजा पोस्टिंग आहे तरी तोंडी स्थगिती देण्याचे अधिकार आहेत का? असा सवाल दिवेगावकरांनी केला आहे.
दिवेगावकर यांची एक संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख
कौस्तुभ दिवेगावकर एक संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं. शिवाय ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी वाचन, पुस्तक तसेच अन्य सामाजिक मुद्द्यांवर बोट ठेवत असतात. मराठी साहित्य हा विषय घेऊन दिवेगावकर यांनी UPSC मध्ये रेकॉर्डब्रेक मार्क मिळवले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Tanaji Sawant In Pune: घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर; तानाजी सावंतांचा अजब पुणे दौरा व्हायरल