World Book Day : पुस्तकांवर आणि साहित्यावर प्रेम करणारे अनेक वाचनवेडे आपण पाहिलेत. यात कुठल्याही वर्गातील लोकांचा समावेश असतो. वाचनप्रेमींच्या वाचनवेडाच्या अनेक स्टोरीज आपण वाचल्या असतील. आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (IAS Kaustubh Diwegaonkar) यांची एक पोस्ट वाचनात आली. त्यांचं पुस्तक प्रेम, वाचनाची आवड किती अफाट आहे, हे या पोस्टवरुन लक्षात येतंय. 


कौस्तुभ दिवेगावकर हे सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत. आणि त्यांनी तब्बल दोन वर्षांनी सुट्टी घेतली आहे अन् सुट्टी घेण्याचा मुख्य उद्देश काय तर पुस्तक खरेदी. या फेसबुक पोस्टसोबत त्यांनी आपल्या आईंसोबतचा आणि पुस्तकांच्या श्रीमंतीबाबतचा असे दोन फोटो देखील शेअर केले आहेत. या पोस्टवर साहित्यप्रेमींनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.


2 वर्षानंतर एक दिवसाची CL घेतली


दिवेगावकर आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, आज बहुतेक 2 वर्षानंतर एक दिवसाची CL घेतली. उदगीरला साहित्य संमेलनाला जाऊन आलो. पुस्तक खरेदी हा मुख्य हेतू. आईसोबत संमेलनाला जायची ही दुसरी वेळ. पहिल्यांदा 23 वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील परळीच्या साहित्य संमेलनाला. परळी आईचे माहेर. मी तिसरी चौथीत असताना. तेव्हा बालकुमार संमेलन मुख्य संमेलनात असे. भा रा भागवत, राजा मंगळवेढेकर, शैला लोहिया अशी छान मंडळी त्या कार्यक्रमाला होती. मोठ्यांचे परिसंवाद आठवत नाहीत. कवी संमेलनात झब्बा पायजमा घातलेले महानोर पाहिले होते. पुस्तकाच्या दालनात मात्र गेल्याचे आठवत नाही. आईला विचारले तर म्हणाली पैसे नव्हते तेव्हा. वाचायची आवड खूप होती, असं दिवेगावकर म्हणतात.



पोस्टमध्ये पुढे ते म्हणतात, नंतर इंजिनीअरिंगला (जे तीन वर्ष पास होऊन शेवटच्या वर्षी अर्धवट सुटले.) असताना सांगलीच्या साहित्य संमेलनाला गेलो. पुस्तके फक्त पाहिली. खूप घ्यायची इच्छा असे. तेव्हा माझ्याकडे पैसे नसत. इंजिनीयरला (सेकंड क्लास पास) 25 हजार वगैरे मिळतात असे (शिकत असताना 2010 ला) माहीत होते. तेव्हा मी दर महिन्याला 5 हजाराची पुस्तके घ्यायचे ठरवले होते. आज सरकारी नोकरीच्या पगारात (आणि पगारातच) भागवताना कधीच पुस्तके घ्यायला पैसे कमी पडले नाहीत. आज आई सोबत होती तर हे पुस्तक घ्यावं का की लायब्ररीमधून घेऊन वाचावं ही चर्चा 1-2 वेळा झाली, असं दिवेगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


पुस्तकांची श्रीमंती दाखवायला अजिबात संकोच वाटत नाही


मला पुस्तकांची श्रीमंती दाखवायला अजिबात संकोच वाटत नाही. मराठी साहित्य या विषयाने मला UPSC मध्ये रेकॉर्डब्रेक मार्क दिले. नोकरीला लावले. आईची तर दोन दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रस्थापित की विद्रोही या वादात मला पडायचे नाही. पण कोण कुठली बीड-लातूर जिल्ह्यातील मायलेकरं या भाषेनं, या साहित्य व्यवहारानं जगवली हे नक्की, असं दिवेगावकर यांनी म्हटलं आहे. 


दिवेगावकर एक संवेदनशील अधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर एक संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं. शिवाय ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी वाचन, पुस्तक तसेच अन्य सामाजिक मुद्द्यांवर बोट ठेवत असतात. स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. 'IAS होणे एक मोठी संधी आहे. पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही हिरो नाहीत' असं त्यांनी म्हटलं होतं. मराठी साहित्य हा विषय घेऊन दिवेगावकर यांनी UPSC मध्ये रेकॉर्डब्रेक मार्क मिळवले होते.