अकोला : सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे दोघेही पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात करणार काम करणार आहेत. आज पुण्यातील राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात या दोघांनीही राष्ट्रवादीत औपचारिक प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री आणि राष्ट्रवादी चित्रपट आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे यांची उपस्थिती होती. रघुवीर खेडकर तमाशा फडमालक आणि कलाकारांची संघटना असलेल्या 'अखिल भारतीय तमाशा परिषदे'चे अध्यक्ष आहेत. तर मंगला बनसोडे या या संघटनेच्या कार्याध्यक्ष आहेत. या दोघांचा विधिवत प्रवेश लवकरच पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते प्रमुख्याने उपस्थितीत राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष  बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. मुंबईत होणाऱ्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक तमाशा फडमालक आणि कलाकाार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


आम्ही लोककलावंत आहोत ही आमची चूक आहे का? रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे यांना माझा कट्ट्यावर अश्रू अनावर


येत्या पंधरवाड्यात होणार मुंबईत प्रवेश सोहळा :


काल रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे यांनी पुण्यातील राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी चित्रपट आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षा आणि चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे उपस्थित होत्या. यावेळी या दोघांनीही राष्ट्रवादी चित्रपट विभागात औपचारिक प्रवेश केला. यावेळी रघुवीर खेडकर यांनी आपण आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात सामिल झाल्याचं स्पष्ट केलं. लवकरच मुंबईतील मुख्य प्रवेश सोहळ्यात अनेक तमाशा फडमालक आणि कलाकार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं खेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या पंधरा दिवसांत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक बडे नेते आणि चित्रपट कलाकार उपस्थित असणार आहेत. 


लोककलावंतांची व्यथा पाहून अनेकांना अश्रू अनावर; 'माझा कट्टा' पाहून कलावंतांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे


कोण आहेत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर? :


मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर हे दोघेही तमाशा क्षेत्रातील अतिशय ताकदीचे कलाकार आहेत. मंगला बनसोडेंचा प्रत्यक्ष वारसा 'तमाशासम्राज्ञी' विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा आहे. मंगला बनसोडे, संध्या माने आणि मालती इनामदार या तिन्ही लेकी महाराष्ट्राला विठाबाईंनी दिल्यात. या तिघींनीही आपापले फड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिवंत ठेवले. रघुवीर खेडकर हे तमाशा फडातील ख्यातकीर्त 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत आहेत. सोबतच ते तमाशा फडचालकही आहेत. रघुवीर खेडकर हे सध्या तमाशा फडमालक आणि कलाकारांच्या नव्याने स्थापन झालेल्या 'अखिल भारतीय तमाशा परिषद' या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या तरूणपणात त्यांनी बोर्डावर केलेलं थाळीनृत्य अप्रतिम असं असायचं. त्यांचं हे नृत्य कथ्थक व लोककलेचे मिश्रण असे.
 
मंगला बनसोडे :


तमाशा कलावंत मंगला बनसोडे ह्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आणि जेष्ठ तमाशा कलावंत विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्या कन्या आहेत. ढोलकी फडाच्या तमाशातील कलावती.  ढोलकी फडाच्या तमाशात गायिका, नर्तिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका त्यांनी आजवर साकार केल्या आहेत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तमाशाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षी आपली आई विठाबाई नारायणगावकर यांच्या ढोलकी फडाच्या तमाशात त्यांनी कलेचा प्रारंभ केला. त्यांचे शिक्षण चौथी उत्तीर्ण असे आहे. मंगला बनसोडे यांनी विठाबाईंसोबत प्रथम नृत्यास सुरुवात केली. कालांतराने मुजरा, गौळण, लावण्या, फार्स आणि वगनाट्यात त्या काम करू लागल्या. 


 वगनाट्यातील नायिका, खलनायिका, विनोदी नायिका अशा विविधांगी भूमिका त्यांनी सादर केल्यात. सोबतच अभिनेत्रीसह एक उत्कृष्ट गायिका म्हणूनी त्यांनी विलक्षण लोकप्रियता प्राप्त केली आहे. 'कृष्णाकाठचा फरारी'  या वगनाट्यात किरण ही सुनेची भूमिका, 'मुंबईची केळेवाली'  मधील मोहना ही मुलीची भूमिका, 'रक्तात न्हाली कुऱ्हाड'  या वगनाट्यात शेवंता आचारणीची भूमिका, 'विष्णू बाळा पाटील' या वगनाट्यात शेवंताची विनोदी भूमिका, 'बापू वीरू वाटेगावकर' या वगनाट्यातील विनोदी भूमिका, 'जन्मठेप कुंकवाची' या वगनाट्यात सासूची भूमिका, ‘कारगिलच्या युद्ध ज्वाला'  या वगनाट्यामधील कॅप्टनची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. 


मंगला बनसोडे यांनी अखिल भारतीय लोककला संमेलनात कराड येथे तमाशा सादर केला होता. 2001 मध्ये महाराष्ट्र शासनाचा 'सामाजिक न्याय पुरस्कार', 2010 चा शासनाचा 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायगावकर लोककला जीवन गौरव पुरस्कार' त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच सन 2017 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते 'वयोश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्कारा'ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीवर लोककला समितीचे सदस्यत्व त्यांनी भूषविले आहे. तमाशा फडमालक आणि कलाकारांची संघटना असलेल्या 'अखिल भारतीय तमाशा परिषदे'च्या मंगला बनसोडे या सध्या कार्याध्यक्ष आहेत. 


रघुवीर खेडकर :


मागील चार दशकांहून अधिक काळापासून रघुवीर खेडकर हे तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहेत. आपली आई कांताबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेल्या तमाशा मंडळाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळीत आहेत. उत्तम सोंगाड्या म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी दिल्ली येथे तमाशा सादर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. चंदीगड येथे संगीत नाटक अकादमी, मुंबई विद्यापीठ येथेही त्यांनी तमाशा सादर केला आहे. एक प्रयोगशील तमाशा फड मालक आणि कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्षही होते. अलिकडेच राज्यातील सुमारे 130 तमाशा फडमालक व कलाकारांनी सर्व संघटनांचे एकत्रीकरण करून 'अखिल भारतीय तमाशा परिषदे'ची स्थापना केली. या संस्थेच्या अध्यक्षपदी रघुवीर खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. 


एबीपी माझा इम्पॅक्ट : 1949 नंतर प्रथमच राज्यातील फड मालक एकत्र; महाराष्ट्रातील तमाशा फड मालकांना प्रत्येकी 11 हजारांची मदत


'माझा कट्टा' कार्यक्रमात मांडलं होतं तमाशा कलावंतांचं 'दु:ख' अन 'परवड' : 


लोककला जीवापाड जपणाऱ्या आणि या कलेवर अतोनात प्रेम असणाऱ्या तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी 3 एप्रिलला 'माझा कट्टा' या 'एबीपी माझा'च्या लोकप्रिय कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कलावंत म्हणून आपल्या वाटेतील व्यथा आणि काळीज पिळवटून टाकणारी कहाणी सर्वांपुढे मांडली होती. कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, त्यांचं दु:ख या दोघांनी रसिकांसमोर मांडले. लॉकडाऊनकाळात समाजातील अनेक घटकांना सरकारने मदत केली. मात्र, तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत व्यक्त करतांना त्यांनी कार्यक्रमातच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. त्यांच्या या दु:ख अन परवडीनं अख्खा महाराष्ट्र हेलावला होता. अनेक व्यक्ती आणि संस्था यानंतर त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या होत्या. याच कार्यक्रमानंतर राज्यातील सर्व तमाशा फडमालक आणि कलाकारांच्या संघटना यांनी आपापल्या संघटना विसर्जित करीत 'अखिल भारतीय तमाशा परिषद' या सर्व संघटनांच्या एकीकृत संघटनेची  स्थापना केली. या संघटनेच्या अध्यक्षपदी रघुवीर खेडकर तर कार्याध्यक्षपदी मंगला बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली. 


राष्ट्रवादी चित्रपट विभागात वाढलं कलाकारांचं 'इनकमिंग' : 
   
राज्यात शिवसेना आणि मनसेच्या चित्रपट आघाड्या सक्रिय आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादीनं चित्रपट क्षेत्रात आपलं संघटन बळकट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चालविले आहेत. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीत मराठी-हिंदी चित्रपट क्षोत्रातील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिका प्रवेश करीत आहेत. पक्षाच्या चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणे येथील बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पाटील यांनी पक्षाची चित्रपट आघाडी मजबूत करण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध कलाकारांना पक्षाशी जोडलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सविता माल्पेकर, प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना सुरेखा कुडची यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी आतापर्यंत राष्ट्रवादी चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे.