लातूर : परभणीतून आयसिसशी संबंधित असल्याच्या संशयावरुन शाहीद खानला अटक करण्यात आली. त्या पाश्वभूमीवर महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. अतुलचंद्र कुलकर्णी हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. आपल्या कारकीर्दीचा सुरुवात त्यांनी मराठवाड्यात केली. दोन महिन्यांपूर्वी एटीएसचे प्रमुख होण्याआधी ते मुंबई क्राईम ब्रान्चचे प्रमुख होते. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आयसिस, मुंबई-मराठवाडा कनेक्शन ते झाकीर नाईक संदर्भातील सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.


 

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी केलेली EXCLUSIVE बातचीत..

 

प्रश्न - एटीएस पथकाचे प्रमुख एवढे इंटरॅक्टिव्ह आहेत असं दिसलं, पण त्याची गरज आहे खरंतर.. हो ना?

उत्तर - नक्कीच ना, तुम्ही समाजापर्यंत पोहोचलं तर पाहिजे, तुमचा काय पॉईंट ऑफ व्हू आहे तो, त्याच्यासाठी जायलाच पाहिजे.

 

प्रश्न - तुमची टूर स्पेसिफीक आहे का?, कारण मराठवाड्यात खूप बातम्या येत आहेत वेगवेगळ्या.

उत्तर - नाही तो योगायोग आहे, टूरचा आणि त्याचा तसा संबंध नाही. पण मराठवाड्यात माझं लक्ष आहे आणि मराठवाड्यात काही गोष्टी खटकणाऱ्या घडलेल्या आहेत. जसं आता आपण परभणीसमोरीचं बघतोय.

 

प्रश्न - सर हे नवीन नाही, म्हणजे मी गेली 14 वर्ष पत्रकारिता करतोय तर बीडमध्ये त्या खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. मराठवाड्यातले अनेक तरुण गायब आहेत. औरंगाबादची ती सगळी केस आहे. ती पार्श्वभूमी लक्षात ठेवूनच तुम्ही करताय सगळं?

उत्तर - नुसती ती पार्श्वभूमी नाही, त्यानंतर आमच्याकडे येणारे काही इंडिकेटर्स आणि सिग्नल्स आहेत ते पाहत राहातो. त्यादृष्टीने हे जिल्हे पुन्हा पाहण्याची मला गरज वाटते.

 

प्रश्न - पण तुमचं इंटरॅक्शन आहे ते याच लेव्हलला राहणार आहे की या पुढेही जाणार आहे तरुणांशी सतत संवाद साधलं पाहिजे, त्याचं माध्यम काय असलं पाहिजे, त्याची भाषा काय असली पाहिजे?

उत्तर - भाषा ही त्यांना समजेल अशी असली पाहिजे, मराठी म्हटलं तर मराठी, हिंदी म्हटलं तर हिंदी, इंग्लिश म्हटलं तर इंग्लिश, आणि माझी अशी कल्पना आहे की या इंटरॅक्शन्स या आणखी इन्सेटीव्ह व्हायला पाहिजेत. आणि विविध पातळीवर जायला पाहिजे. प्रत्येक पातळीवर पोहोचणं कदाचित मला शक्य होणार नाही. पण लोकांपर्यंत जावं, त्यांना आपली भूमिका सांगावी आणि लोकांचं सहकार्य मागून घ्यावं.

 

प्रश्न - मध्यंतरी एक प्रयोग असा झाला की मुल्ला मौलवींनाही सहभागी करुन घेतलं पाहिजे, एक प्रयोग तर मला माहित आहे, जालन्यामध्ये उस्मानाबादमध्ये, मशिदीमधून दीक्षित साहेबांनी सांगितलं होतं की, तुम्ही गो प्रिच अँड टॉक टू द पीपल

उत्तर - मी स्पेसिफीक मुल्ला मौलवी पण म्हणत नाही, मी म्हणेन, की समाजातल्या सगळ्या घटकांची एक आपल्यामध्ये एक, त्यांना आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. सगळ्या घटकांना त्यात मुल्ला मौलवीपण आले. आणि त्यांच्याकडून काही वेगळं आवाहन करता येतील का, त्यांच्या माध्यमातून काही वेगळी आवाहनं करता येतील का त्यांच्या माध्यमातून काही पद्धतीने वेगळे कार्यक्रम राबवता येतील का याचा माझा विचार चालू आहे.

 

प्रश्न - मग या संवादातून कुठेतरी विसंवाद आहे असं दिसतंय, काहीतरी गोष्टी आहेत जिथे कुणीच पोहोचलेलं नाही पण पोहोचायची गरज होती एका विशिष्ट धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये?

उत्तर - विसंवाद आहे अशातला भाग वाटत नाही मला पण कम्युनिकेशन गॅप नक्की आहे. आणि जे आम्हाला वाटतं किंवा जे पोलिसांना वाटतं, असं आपण म्हणू. दहशतवाद विरोधी पथक म्हणा किंवा पोलिस म्हणा यांना जे वाटतं आणि त्या समाजामध्ये जे एक थोडसं वेगळ्या पद्धतीची मनोभूमिका आहे, याच्यात जोड घालण्याची गरज आहे कुठेतरी ते जोडण्याची गरज आहे, आणि ते आम्ही करु.

 

प्रश्न - आम्हाला त्या जीआरबद्दल सांगाल कारण मघाशी बोलताना आणखी एक म्हणालात की, शिक्षणामध्ये दहशतवाद हा विषय आणला पाहिजे?

उत्तर - शिक्षणाचा जो करिक्युलम आहे, शिक्षण विभागाचा त्या करिक्युलममध्ये काय काय आणायला पाहिजे, याबद्दलसुद्धा त्या जीआरमध्ये सूचना आहेत. शिक्षणामध्ये कुठल्या भाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे याच्याबद्दलचे विचार आहेत मग शालेय शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, या दोन्ही विषयांवर सखोल विचार झालेला आहे. म्हणजे मला आठवतं मी त्यातल्या काही मीटिंग अटेंड केलेल्या आहेत. पूर्वीच्या चार्जमध्ये हा जीआर यावा यासाठी आम्ही लोकसुद्धा जास्त आग्रही होतो, की यायला पाहिजे याच्यातून प्रत्येक विभागाला मी काय करायचं हे कळेल. अर्बन डेव्हलपमेंटने काय करायंच, की बाबा प्रत्येक वेळेला मी आता मालेगावला गेलो होतो त्यावेळेला लोकांच्या तक्रारी अशा होत्या 2008 साली की आमच्याकडे हॉस्पिटल नाही. तुम्हाला पण माहित असेल की सोनिया गांधींकडे त्यांनी मागणी केली होती की, आम्हाला हॉस्पिटल नाही ना, मग आम्ही तुमचे चेक घेणार नाही, मदतीचे. मग त्यावेळी हॉस्पिटलची घोषणा करण्यात आली. मूलभूत सुविधा ज्या आहेत, आरोग्य, रस्ते, सांडपाणी व्यवस्था या सगळ्या गोष्टी का आपण देऊ शकत नाही. मग याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. आताच्या जीआरमध्ये ही जबाबदारी आहे आणि तुम्ही बघायला पाहिजे हे सगळं. त्यामुळे मला वाटतं की जीआर हा त्यादिशेने उचललेलं पाऊल आहे आणि आम्ही लोकांनी काय करायचं हे ही त्यात नमूद आहे.

 

प्रश्न - जर दहशतवाद हा विषय शिक्षणात आणायचा असेल तर ते कोणत्या पातळीवर आणायचं?

उत्तर -  हा विषय पाचवीपासूनच आणायचा आहे. त्यापूर्वी नाही. पाचवी किंवा सातवीपासून हा विषय सुरु करता येईल. त्यापूर्वी त्याची आवश्यकताही नाही.

 

प्रश्न - याचा अभ्यासक्रम काय असेल?

उत्तर - आता त्यावरच चर्चा होणार आहे. जीआर 4 जुलैला निघालाय, त्याच्यात त्या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत.

 

प्रश्न - तुम्हाला काय अपेक्षित आहे?

उत्तर - सर्वधर्म समभाव ही संकल्पना आहे आपली. सर्व धर्मांना एकत्र करणं किंवा एकत्र येणं सर्वांनी. कुठेतरी कॉमन बेस आहे सगळ्यांचा. संस्कृती एक आहे. खाण्याच्या सवयी एक आहेत. या बेसवरती बिल्ड करण्याची गरज आहे.

 

प्रश्न - अभ्यासक्रमात आयसिसविषयी स्पेसिफीक माहिती दिली पाहिजे?

उत्तर - मला नाही वाटत, आज आयसिस आहे, उद्या दुसरं काहीतरी असेल. काल अल-कायदा होतं, त्याच्याआधी एलईटी, आयएम आणि सिमी यांनी सतावलेलं होतं. प्रत्येक वेळेला संघटनेचं नाव बदलेल. ती संघटना काय आहे हे विद्यार्थ्यांना माहित होण्याची गरज नाही. काय करायला हवंय आणि काय करायला नको हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. आणि त्यात मग इंटरनेट संदर्भातला विचार असणार.



प्रश्न - जीआरमध्ये सांगितल्याप्रमाणे दहशतवादाचं निर्मूलन करणं ही केवळ एटीएसची जबाबदारी नाही?

उत्तर - बरोबर. ती त्या त्या विभागाची जबाबदारी आहे आणि दहशतवाद निर्मूलनापेक्षा अल्पसंख्यांकाच्या विकासाची योग्य भूमिका काय घ्यायला पाहिजे आणि कोणकोणत्या विभागांनी त्यात सहभाग घेतला पाहिजे, अशा पद्धतीचं या जीआरमध्ये विवरण आहे. आणि मला वाटंत हा जीआर चांगला आहे. चांगलं पाऊल आहे. त्याच्यावर अजून विचार करूव सुधारणा करता येतील.

 

प्रश्न - दहशतवाद विरोधी पथकाविषयी मुस्लिमधर्मियांच्या मनामध्ये अविश्वास मोठ्या प्रमाणावर आहे. त्यावर तोडगा कसा काढणार?

उत्तर- मी स्वत: अशा मताचा आहे, एका प्रश्नकर्त्याला मी थोडक्यात सांगितलं आहे की, कुणावर कुठल्याही पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे हा विश्वास समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. दहशतवाद विरोधी पथक जी कारवाई करेल त्याला काहीतरी आधार असेल. आणि ते त्या समाजाच्या लोकांना समजावून सांगितलं जाईल.

 

प्रश्न - ज्याप्रकारच्या बातम्या यात आहेत त्यातून हा विश्वास मिळवणं कसं शक्य होईल?

उत्तर - अगदी बरोबर आहे, पण मला स्वत:ला असं वाटतं की जर माझी नियत साफ असेल आणि जर माझ्या अधिकाऱ्यांनी जर योग्य काम केलं असेल, योग्य पुराव्यानिशी योग्य व्यक्तीलाच अटक केली असेल, तर तर मला वाटत नाही कुणी त्यात वावगं समजावं. पण हे त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. आम्ही जेव्हा परभणीच्या मुलाला ताब्यात घेतलं त्यावेळी पत्रकारांना उत्तर देताना मी म्हटलं की त्या मुलावर आताच आरोपी म्हणून शिक्का मारु नका. त्याला लगेचच आयसिसचा संशयित म्हणू नका. आतापर्यंत आम्हाला जे सापडलं त्यादृष्टीने आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. यापुढे आम्ही आमची केस बिल्ड करु पुरावे गोळा करुन आम्ही चार्जशीट दाखल करु. त्यानंतर तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. आज लगेच पहिल्याच दिवशी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका.

 

प्रश्न - महाराष्ट्राचा विचार करता काय सांगता येईल?

उत्तर - महाराष्ट्रात विविध ठिकाणी एटीएस, गुन्हे शाखा, आणि स्थानिक पोलिस लक्ष ठेवून आहेत. मराठवाड्यातील काही जिल्हे असे आहेत की जिथे आम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे. पूर्वीचे सगळे संदर्भ लक्षात घेऊन त्याप्रकारे त्याठिकाणी आमच्या कामाची बांधणी करण्याची गरज आहे.

 

प्रश्न - मुंबईत आज नेमकी काय परिस्थिती सांगता येईल?

उत्तर - मुंबईतील एकंदर परिस्थिती हा नक्कीच विचार करण्याचा भाग आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई, नवी मुंबई भागावर आमचं लक्ष आहे.

 

प्रश्न - विधानसभेत शिवसेनेच्या आमदाराने या मुद्द्यावर बोलताना मराठवाड्यातले 100 पेक्षा जास्त तरुण बेपत्ता असून आयसिसमध्ये भरती झाले आहेत, असा संशय व्यक्त केला, यावर तुमचं काय म्हणण आहे?

उत्तर - गेल्या काही दिवसात मराठवाड्यातून काही तरुण बेपत्ता आहेत. पण ते सर्वच आयसिसमध्ये भरती झाले अस म्हणता येणार नाही. त्यातही संख्या कमी-जास्त होऊ शकते. बेपत्ता असलेला किंवा देशाबाहेर गेलेला तरुण आयसिसमध्येच भरती होतो असे नाही. काही तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याची माहिती आमच्याकडे आहे.

 

प्रश्न - मराठवाड्याजवळ इतर राज्यांची असलेली सीमा याचा काही यात संबंध आहे का?

उत्तर - नक्कीच आहे. मी मराठवाड्यात काम केलेलं आहे. त्यामुळे इथला विचार करता बाकी शहरांपेक्षा हैदराबाद इथल्या तरुणांना जवळ वाटते. त्यांचे संपर्कही प्रस्थापित होतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठीण आहे. पण आम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन आहोत.

 

प्रश्न - जिल्हा पातळीवरील दहशतवाद विरोधी पथकं पुरेशी सक्षम नाहीत. यावर तुमचे मत काय?

उत्तर - जिल्हा पातळीवरील दहशतवाद विरोधी सेल्स ही जिल्हा पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे मी याबाबतीत काही बोलू शकत नाही. पण जेव्हा कधी आम्हाला गरज लागते तेव्हा या सेल्सकडून माहिती मिळते. त्याचाही आम्ही विचार करत आहोत.

 

प्रश्न - झाकीर नाईकबद्दल काय सांगाल?

उत्तर - झाकीर नाईक एक धर्मप्रचारक आहे. त्यांच्या भाषणांवर, कृतीवर आमचं लक्ष आहे. तपास सुरु आहे. जर काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

 

प्रश्न - परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे आणि तुम्ही लक्ष ठेवून आहात असं म्हणायचं का?

उत्तर - परिस्थीती चिंताजनक नाही, पण विचार करण्यासारखी नक्कीच आहे. परिस्थिती बदलत असते आणि आम्हीही परिस्थीतीनुसार बदलत असतो. परिस्थितीवर लक्ष ठेवून असतो.

 

 

एटीएस प्रमुखांची संपूर्ण मुलाखत