मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील तलाठी पेपर फुटी प्रकरणात (Talathi Bharti Exam Paper Leak) मूळ पेपर नागपुरातून फोडण्यात आला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्या ठिकाणच्या एका परीक्षा केंद्रावरून पेपर फोडून त्याचे प्रश्न हे छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रावर पाठवण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
राज्यभरात तलाठी भरती परीक्षा (Talathi Bharti Exam) 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली. यामध्ये 5 सप्टेंबर रोजी तलाठी भरतीचा पेपर फुटला होता. छत्रपती संभाजीनगर येथील TCS ION केंद्रातील पर्यवेक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरविली असल्याचं समोर आलं होतं.मात्र प्रत्यक्षात याचा सखोल तपास संभाजीनगर पोलिसांनी केल्यानंतर नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने तलाठीचा पेपर फोडून या पर्यवेक्षकाला प्रश्न पाठवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागपूरमधून अजून नक्की किती परीक्षा केंद्रावर पेपर फोडून इतरत्र पाठविण्यात आलं होतं असा प्रश्न आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे.
गणेश गुसिंगे यावर चार महिन्यानंतरही चार्जशिट दाखल नाही
नाशिक येथील परीक्षा केंद्रावर गणेश गुसिंगे या अट्टल पेपरफोड्याने तलाठीचा पेपर फोडला होता. त्याचे चार्जशीट मागील आठवड्यापर्यंत दाखल करण्यात आले नव्हते. म्हणजे या घोटाळ्याच्या मूळापर्यंत कोण होते, ही साखळी नक्की कोणापर्यंत पोचत आहे याबद्दल सर्वसामान्य उमेदवारांना काहीही माहिती नाही.
जर घोटाळ्याचा तपासच अजून अपूर्ण आहे तर निकाल कशाचा जाहीर करताय? घोटाळेबाजाची निवड झाल्यास त्याची जबाबदारी महसूल अपर सचिव किंवा महसूल मंत्री घेतील काय? असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून विचारला जातोय.
थेट मंत्रालयापर्यंत धागेदोरे?
तलाठी भरती घोटाळा प्रकरण वाटते तेवढ छोटे नसून यात अनेक मोठे मासे असण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण 5 सप्टेंबरला पोलिसांनी औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राच्या बाहेरुन राजू नागरे याला अटक केली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलिसांना थेट मंत्रालयातून फोनाफोनी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक मोठे मासे असण्याची शक्यता पोलिसांना आहे. तर पोलिसांच्या तपासात या प्रकरणात आणखी कोणकोणती नावं समोर येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
ही बातमी वाचा: