नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) केंद्रीय समितीची आणि महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक शुक्रवार 29 डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडली. या बैठकीमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसचे राज्यातील नेते सहभागी होणार नाहीत. तसेच जागावाटपासंदर्भात काँग्रेस हायकमांड, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारच (Sharad Pawar) सगळं ठरवणार आहेत. यामझ्ये जिंकण्याची क्षमता हा एकमेव निकष असल्याचं सांगण्यात येतंय. 


दरम्यान जागावाटपासंदर्भात चर्चा ही दिल्लीत होणार असून ती कधी होणार याबाबत मात्र काँग्रेसच्या नेत्यांना कोणताही कल्पना नाही. तसेच महाराष्ट्रात लोकसभेच्या कोण , किती आणि कुठल्या जागा लढवणार याचाही निर्णय काँग्रेस हायकमांड, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत चर्चा करुन घेण्यात येईल. तसेच या बैठकीमध्ये वंचितच्या भूमिकेवरही चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचं जाणून घेतलं मत


नवी दिल्लीत आज पार पडलेल्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांबाबतची मतं जाणून घेतली. तसेच यावेळी या नेत्यांचे वंचित बाबतचे देखील मत जाणून घेतले. वंचित बहुजन आघाडी बद्दलचा आधीचा अनुभव पाहता वंचित फार गांभीर्याने गोष्टी घेणार नसल्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा सूर होता. पण जागा वाटपाबाबत सगळे निर्णय हायकमांड मविआतील इतर दोन पक्षांसोबत चर्चा करुन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील नेते या निर्णयप्रक्रियेत नसणार हे देखील स्पष्ट झालंय. 



जिंकण्याची क्षमता हाच जागावाटपचा निकष


महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी मतदारसंघांबाबतचे अहवाल आजच्या बैठकीत समितीला सादर केलेत. यामध्ये जिंकण्याची क्षमता हा जागावाटपाचा निकष असणार आहे. साधारणपणे 8 ते 10 जागांवर वाद होण्याची शक्यता असून इतर जागावाटप सोपे असल्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आजच्या बैठकीत जाणून घेतलेली मते काँग्रेसची समिती हायकमांडला कळवतील. 


उद्धव ठाकरे दिल्लीवारी करणार 


लोकसभेच्या (Loksabha election 2024) जागावाटपाबाबत सध्या बराच संभ्रम निर्माण आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरु देखील सुरु आहे. दरम्यान नव वर्षात म्हणजेच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा होणार असल्याची माहिती समोर येतेय. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत ही बैठक होणार आहे. जानेवारी 2 किंवा 3 तारखेला ही बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही तारीख ठरलेली नसल्याचं सांगण्यात येतंय. तसेच या बैठकांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा : 


Loksabha Election 2024 : लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची दिल्लीत होणार बैठक, उद्धव ठाकरे दिल्लीवारी करण्याची शक्यता