नांदेड: शासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्यांना कसं लुटतात याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये आला आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करून तलाठ्याने (Talathi of Himayatnagar) चुकीचा फेरफार तयार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर एका शेतकरी महिलेने तलाठ्याचा सत्कार करण्यासाठी चक्क सत्कार पत्रिका छापली. जाणीवपूर्वक चुकीचा फेरफार तयार करून माझ्या कपळावरचं कुंकू पुसून माझ्या लहान लेकरांना पोरके करणाऱ्या कर्तृत्वान इनामदार तलाठ्याचा भव्य सत्कार, अशा आशयाची पत्रिका पीडित महिलेने छापली. ही पत्रिका आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.


चुकीचा फेरफार केल्याने पतीची आत्महत्या


जोत्स्ना जाधव यांचे पती परमेश्वर जाधव यांची हिमायतनगर शहराजवळ नऊ गुंठे जमीन होती. पण त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत शेख इरफान आणि मिर्झा जुनेद या दोघांनी बनावट कागपत्रांद्वारे ती जमीन स्वतःच्या नावावर करुन घेतली. यासाठी त्यांना तलाठी दत्तात्रय पुणेकर आणि मंडल अधिकाऱ्याने जमिनीचा चुकीचा फेरफार करुन दिला असा ज्योत्स्ना जाधव यांचा आरोप आहे. जमीन गेल्याने परमेश्वर जाधव यांनी 28 नोहेंबर रोजी आत्महत्या केली. 


तलाठ्यावर अद्याप कारवाई नाही


पतीच्या आत्महत्येनंतर ज्योत्स्ना जाधव यांनी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. तसेच चुकीचा फेरफार केल्याची तक्रार देखील केल्यानंतर उप विभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी फेरफार रद्द केला. चुकीचा फेरफार रद्द केला पण तो करणाऱ्या तलाठ्यावर आणि मंडल अधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पीडित महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 


अधिकाऱ्यांनी नवऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करून माझं घर उघड्यावर आणले, त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल माझी अणि पोरक्या मुलांची इच्छा आहे की भर चौकात बँड लावून हिमायतनगर येथील तलाठ्याचा भव्य सत्कार करावा आणि यावेळी आपणही उपस्थित राहिलात तर आम्हाला अधिक आनंद होईल, असं निमंत्रण देणारी पत्रिकाचं छापली आहे. 


आता पीडित महिलेने छापलेल्या पत्रिकेनंतरही निर्ढावलेले आणि सुस्त प्रशासन या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करणार का आणि त्या महिलेला तिची जमीन परत देऊन न्याय देणार का हे पाहावं लागेल. या प्रकरणात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे. 


ही बातमी वाचा: