चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन 1 जुलैपासून पर्यटनासाठी खुला करण्यात आलाय आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अवघ्या 2 महिन्यात 20 हजार पर्यटकांनी ताडोबा सफारी केली आहे. विशेष म्हणजे सध्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पावसामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. ताडोबात येणारे पर्यटक कोर झोन मध्ये सफारी करण्यास पहिली पसंती देतात पण यावेळी बफर मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 


Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गाईड्ससाठी स्टार सिस्टम लागू


बफर क्षेत्रात 13 प्रवेशद्वार असून सर्वच गेट वरून पर्यटक ताडोबाच्या बफर क्षेत्रात सफारी करत आहेत. कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन गेल्या तीन महिन्यांपासून शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनला कंटाळलेले लोकं ताडोबाच्या निसर्गरम्य जंगलाची सफारी करत आहेत. ताडोबाच्या कोर झोनप्रमाणे बफर मध्ये देखील वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, हरीण आणि इतर प्राण्यांचं दर्शन होतं आणि त्यामुळे पर्यटकांना सफारी पुरेपूर आनंद घेता येतो.



ताडोबात येणाऱ्या या पर्यटकांमुळे स्थानिकांच्या उद्योग-व्यवसायाला पण गती मिळाली आहे. कोरोनामुळे अनेक जणांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतांना ताडोबातील पर्यटन स्थानिकांसाठी वरदान ठरतंय. गेल्या दोन महिन्यात फक्त गाईड आणि जिप्सीचालकांना पर्यटकांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मिळाले आहे.


ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढवण्यासाठी लगतच्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करा; मुख्यमंत्र्यांचा आदेश


ऐन हंगामात ताडोबा व्याघ्र प्रकल्प साडेतीन महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटनावर आधारित हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झालं आहे. रोजगार बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. व्याघ्र प्रेमींची पर्यटनासाठीची पहिली पसंती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा असते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात 115 वाघ आणि 151 बिबटे असल्याचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आलेला आहे.