भंडारा : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) जागा वाटपाच्या दररोज चर्चा रंगलेल्या असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या भंडाऱ्यात मात्र काँग्रेसनं वेगळी चूल मांडल्याचं चित्र बघायला मिळालंय. नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यातील साकोली इथं भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तीन आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. यावेळी एका उमेदवाराला दहा मिनिटं देण्यात आलीत.
दरम्यान, अनेकांनी मोठं शक्तीप्रदर्शन करीत पक्षाकडं दावेदारी केली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार या मुलाखती घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर साकोलीतून दावेदारी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र या मुखतीला दिसले नाहीत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सातही विधानसभेवर यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दावा सांगितलेले आहे. आज मुलाखती झाल्यानं काँग्रेस या सातही जागा सोडणार नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. एकंदरीतचं काँग्रेसनं घेतलेल्या निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखत घेतल्यानं, काँग्रेस राज्यात स्वतंत्र लढण्याची तयारी किंवा वेगळी चूल तर मांडत नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भंडारा-गोंदियातील 7 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा
दरम्यान, जागावाटपापूर्वी नाना पटोले यांनी दावा करत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना कोंडीत पकडले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून भंडारा तर, राष्ट्रवादी काँग्रेसने तुमसर, भंडारा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चार विधानसभेवर दावा केला आहे. नाना पटोले दोन्ही जिल्ह्यातील एकही जागा सोडायला तयार नसल्यानं महाविकास आघाडीतील शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दिसणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसत आहे.
आगामी काळात महाविकास आघाडीचं काम करून उमेदवारांना विजयी करण्याचा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांच्या भंडाऱ्याच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. गृह जिल्हा असलेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सातही विधानसभा जागांवर दावा सांगून या जागा खेचून आणण्यासाठी पटोले यांनी शड्डू ठेकला आहे.
हे ही वाचा