पालघर : श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना मोहम्मद मिरसा नावाच्या व्यक्तीने एका महाकाय बोटीत आश्रय दिला असून ही बोट सध्या समुद्रात फिरत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे. त्यामुळे पालघर किनाऱ्यावरील पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. अन्नधान्य आणि इंधनाचा मोठा साठा असलेली ही बोट अरबी समुद्रात निदर्शनास आल्यामुळे किनारपट्टीवरील सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


श्रीलंकेत घडलेल्या बॉम्बस्फोटात जवळपास 350 नागरिकांचा बळी गेला होता. या स्फोटाची जबाबदारी 'आयसिस' या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. केरळच्या किनारपट्टीवर या दहशतवादी संघटनेच्या हालाचाली वाढत आहेत. नुकतंच केरळमध्ये 15 दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. त्यानंतर केरळसह संपूर्ण भारतात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी लक्षद्वीपमार्गे केरळ किनारपट्टीवर एक बोट पाहिली. या बोटीत 15 दहशतवादी असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे.

ही जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात इंटेलिजन्स ब्युरो, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवादी विरोधी पथक, कोस्टगार्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, सर्व सागरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं.

महाराष्ट्र पोलिसांना किनाऱ्यापासून 12 नॉटिकलपर्यंतच्या समुद्रातील भागात लक्ष ठेवण्याचे, कारवाई करण्याचे अधिकार असल्याने उपस्थितांनी दहशतवादी असलेल्या या बोटीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सागरी पोलिसांनी स्वतः आपल्या जवळील चार स्पीडबोटींद्वारे पेट्रोलिंगला जावे, अशा सूचना देताना लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असंही अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितलं.

संरक्षण यंत्रणेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पालघर पोलिस सतर्क झाले असून किनारपट्टीवरील संशयास्पद हालचाली टिपून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे. जिल्ह्याला 112 किलोमीटरचा समुद्र किनारा असून अर्नाळा, केळवे आणि सातपाटी अशा तीन सागरी पोलिस ठाणी तर वसई, विरार, सफाळे, तारापूर, डहाणू, घोलवड, पालघर अशी सात पोलीस स्टेशन्स आहेत. 13 बंदरे, 10 शासकीय जेट्टी, 3 खाजगी जेट्टी असून अर्नाळा आणि सातपाटी अशी दोन वॉच टॉवर्स, 62 लँडिंग पॉईंट्स, 3 ऑपरेशनल रुम्स अशी सागरी सुरक्षेबाबतची यंत्रणा आहे. तर वसई पोलिस स्टेशन अंतर्गत तीन चेकपोस्ट, वालीव पोलिस स्टेशन अंतर्गत दोन, विरार पोलिस स्टेशन अंतर्गत तीन,अर्नाळा पोलिस स्टेशन अंतर्गत तीन, असे कोस्टल चेक पोस्ट आहेत. एखादी दहशतवादी अथवा संशयास्पद घटना घडल्यास त्यांना रोखण्यासाठी या चेकपोस्टचा वापर करण्यात येत असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

पोलीसांनी अशा संशयित कारवाया रोखण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली असली तरी अपुरे मनुष्यबळ आणि मर्यादित साधनसामुग्रीमुळे पोलिसांना काही मर्यादा येत आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आजही शासन पातळीवरुन काही ठोस पावले उचलण्यास प्रयत्न होत नसल्याचे पहावयास मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे समुद्रातील कान आणि डोळे समजले जाणारे मच्छीमार ही मासेमारी बंदीच्या आदेशाने किनाऱ्यावर स्थिरावले आहेत. त्यामुळे समुद्रातील संरक्षण यंत्रणेवरील जबाबदारी वाढली असून कोस्टगार्ड, पोलिस, सागरी सुरक्षा दल आणि नागरिकांना देशाच्या सुरक्षिततेसाठी डोळ्यात तेल घालून सजग रहावे लागणार आहे.